Breaking News

चांगेफळ ग्रामपंचायतीला ‘आयएसओ’ मानांकन

सरपंच दमयंती मोगल व सचिव सातपुते यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरव 

बुलडाणा, दि. 28 - सिंदखेडराजा तालुक्यातील चांगेफळ ग्रामपंचायतीने अतिशय नियोजनबध्द पध्दतीने गावात विविध विकास योजना राबविल्या असून सदर ग्रामपंचायतीला ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले आहे. नुकतेच पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्या हस्ते सरपंच दमयंती जनार्धन मोगल व सचिव व्ही.एस.सातपुते यांना ‘आयएसओ’ प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी जि.प.अध्यक्षा उमाताई तायडे, उपाध्यक्षा मंगलाताई रायपुरे, मुख्यकार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ आदींची उपस्थिती होती. 
गावाचा सर्वांगीण व शाश्‍वत विकास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे माजी संचालक जनार्धन मोगल यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच, उपसरपंच, सर्वश्री सदस्य व ग्रामसेवक परिश्रम घेत असल्यामुळे गावाची प्रगतीपथाकडे वाटचाल सुरू असून ग्रामपंचायतीने जिल्हास्तरावर नावलौकीक मिळवला आहे. शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचवून गावाला विकासाच्या प्रवाहात आणल्यामुळे गाव हागणदारी मुक्तीकडे वाटचाल करीत असून प्रत्येक घरावर पती-पत्नीच्या नावाची पाटी, त्यावर समाजजागृती म्हणून घोष वाक्ये, भिंतीवर म्हणी व घोषवाक्ये लिहून जनतेमध्ये जनजागृती, गावात आयएसओ अंगणवाडी त्यामध्ये बालकांसाठी सर्व सुविधा, गावातील महिलांना आराम करण्यासाठी माहेरघर, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, गावातील सर्व पुतळ्यासमोर सभामंडप, एक गाव एक स्मशानभूमी, युवकांना खेळण्यासाठी हॉलीबॉलचे मैदान, गावकर्‍यांसाठी शुध्द पिण्याचे पाणी, वेळेवर दाखले व मुलभुत सुविधा मिळाव्यात म्हणून प्रशस्त व सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय, स्वतंत्र शौचालय आदी सुविधा आहेत. या सोबतच सामाजिक उपक्रम म्हणून कचरामुक्ती अभियान, गटारमुक्ती अभियान, सुंदर बैलजोडी स्पर्धा, गुणवंत विद्यार्थी सत्कार, थोर महापुरूषांच्या जयंती व पुण्यतिथीनिमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येते, याशिवाय वेळेवर घरकर पाणी कर भरणार्‍या व शौचालयाचा वापर करणार्‍या कुटुंबांना मोफत दळणाची सुविधाही मिळणार आहे. या सर्व कामांची दखल घेत चांगेफळ ग्रामपंचायतीला ‘आयएसओ’ मानांकन मिळाले आहे. या यशाबद्दल चांगेफळ ग्रामपंचायतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.