Breaking News

मराठा मोर्चे उत्स्फूर्त नव्हते, मराठा सेवा संघाच्या पुरुषोत्तम खेडेकरांचा दावा

उस्मानाबाद, दि. 27 - मराठा मोर्चे हे उत्स्फूर्त नव्हते, असं खळबळजनक विधान खुद्द मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी केलं आहे. मोर्चा हा कधीच उस्फूर्त निघत नसतो. मराठा मोर्चांमागे असलेली अदृश्य शक्ती कोण, हे पाहायलं हवं, असेही खेडेकर म्हणाले. मराठा मोर्चांवर बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराची मात्र तोंडभरुन स्तुती केली. मुख्यमंत्री कधीही जात-पात बघून काम करत नाहीत. त्यामुळे शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांवर ब्राह्मण म्हणून टीका करणं चुकीचं आहे. असे खेडेकर यांनी म्हटलं आहे.
पुरुषोत्तम खेडेकरांनी पुढील दोन वर्षे मराठा संघटनेच्या बांधणीचा आजपासून कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानिमित्त आज उस्मानाबादमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानिमित्त ते  बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त अभियंता असलेले पुरुषोत्तम खेडेकर हे ‘मराठा सेवा संघा’चे संस्थापक अध्यक्ष आहेत. ‘संभाजी ब्रिगेड’ आणि इतर मराठा समाजाच्या संघटनांशी संबंधित असून, ‘शिवधर्म’ संस्थापनाची भूमिका घेऊन राज्यभर प्रचार आणि प्रसार करतात. 2004 सालच्या जेम्स लेन प्रकरणात पुण्याच्या ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्रा’वर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांची भूमिका महाराष्ट्रभर अधिक चर्चेत आली.
खेडेकरांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. विशेषत: ब्राम्हण वर्गावरील टीकात्मक लिखाणामुळे ते कायम वाद आणि चर्चेत राहिले आहेत. ‘शिवरायांच्या बदनामीची केंद्रे’ या त्यांच्या पुस्तकातील काही लिखाणामुळे त्यांच्यावर खटलाही चालला. मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर स्थापन करण्यात आलेल्या मराठा संघटनांच्या समितीतही ते सहभागी होते. त्यांच्या पत्नी रेखा खेडेकर या भाजपाच्या चिखली मतदारसंघातून आमदार होत्या.