Breaking News

48 तास उलटूनही तूर खरेदीचे आदेश नाही

उस्मानाबाद, दि. 27 - तूर खरेदी पुन्हा सुरु करण्यासाठी विविध जिल्ह्यात शेतकर्‍यांसह विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. लातूरमधील खरेदी केंद्रावर जवळपास 75 हजार क्विंटल तूर खरेदीविना पडून आहे. तिथे मनसेने बैलांना तूर खायला घालून आंदोलन केलं. तूर खरेदी सुरु न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा मनसेने दिला आहे. परभणीमध्ये तूर खरेदी पुन्हा सुरू व्हावी यासाठी शेतकर्‍यांसोबत माकपनेही आंदोलन केलं. यावेळी परभणी वसमत महामार्गावर रास्तारोको करण्यात आला.
वाशिममध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तूर जाळून रास्ता रोको केला. 22 एप्रिलपर्यंत नोंदणी झालेल्या तूर खरेदीचे आदेश सरकारने दिलेत. मात्र बाजार समित्यांमध्ये तुरीचं वजनही होत नसल्याचं शेतकर्‍यांचं म्हणणं आहे. एकीकडे सरकार अजूनही शेतकर्‍यांच्या तूरीसंदर्भात ठोस निर्णय घेताना दिसत नाही. दुसरीकडे उस्मानाबादच्या वाशी बाजार समितीत 7 शेतकर्‍यांची तब्बल 44 पोती तूर चोरीला गेली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उघड्यावर असलेल्या लाखो क्विंटल तुरीची राखण करत हजारो शेतकर्‍यांनी बाजार समितीत तळ ठोकला आहे. 22 तारखेपर्यंत बाजार समितीत आलेली तूर राज्य सरकारमार्फत खरेदी करण्याचा निर्णय बाजार समित्यात पोहोचला नाही. त्यामुळे आज राज्यातल्या 316 पैकी एकाही समितीत प्रत्यक्षात वजनाला सुरुवात झाली नाही.