Breaking News

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी - आ. हर्षवर्धन सपकाळ

बुलडाणा, दि. 27 - अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी बुलडाण्याचे आ. हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे सरचिटणिस जनार्दन व्दिवेदी यांनी आज दिल्ली येथे ही नियुक्ती घोषित केली. आ. हर्षवर्धन सपकाळ हे यापूर्वी राजीव गांधी पंचायत राज संघटन या काँग्रेसच्या  सलंग्नित संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणुन कार्यरत आहेत. अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणिस व राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या गुजरात प्रभारी चमु मध्ये स्थान देतांनाच आ. हर्षवर्धन सपकाळ यांची सचिव म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या सोबतच खा.राजीव सातव व आ. वर्षाताई गायकवाड यांचा सुध्दा या मध्ये समावेश करण्यात आला आहे.
गेल्या सहा वर्षांपासून आ. हर्षवर्धन सपकाळ हे राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्थापन केलेल्या कार्यगटाचे सुध्दा ते सदस्य आहेत. यापूर्वी त्यांनी युवक काँग्रेस व एन.एस.यु. आय. या युवकांच्या संबंधीत दोन संघटनांचे प्रभारी म्हणून सुध्दा कार्य केलेले आहे. आ. हर्षवर्धन सपकाळ यांचा पंचायत राज व्यवस्थेतील अनुभव व अभ्यास लक्षात घेता  गेल्या तीन-चार वर्षांपासून त्यांच्यावर राजीव गांधी पंचायत राज संघटनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविण्यात आलेली होती. या संघटन नंतर आता थेटपणे त्यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी नियुक्ती देण्यात आली आहे. उत्तराखंड विधानसभा निवडणूकीच्या वेळी सुध्दा त्यांचा स्क्रिनिंग कमिटीमध्ये समावेश करण्यात आला होता. सोबतच पंजाब विधानसभा निवडणूकीत केंद्रीय स्तरावरून स्थापित करण्यात आलेल्या कोअर कमिटीचे सुध्दा ते सदस्य होते.
गेल्या वर्षभरापासून आ. हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेस विधीमंडळ पातळीवर सुध्दा अभ्यासू व आक्रमक आमदार म्हणून परिचित झाले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतक-यांच्या संपूर्ण कर्जमुक्ती प्रकरणी गोधळ घातल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबीत सुध्दा करण्यात आले होते. काँग्रेसने संपूर्ण राज्यभरात आयोजित केलेल्या संघर्ष यात्रेत सुध्दा त्यांची सक्रिय भूमिका राहलेली आहे.दरम्यान काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी आज सचिव पदी आ. हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती केल्यामुळे बुलडाणा जिल्ह्याचा राष्ट्रीय पातळीवर एक प्रकारे बहुमानच आहे.