Breaking News

नुतन जिल्हाधिकारी डॉ.पुलकूंडवार यांनी स्वीकारला पदभार

बुलडाणा, दि. 27 - जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांची क्रीडा आयुक्त या पदावर बदली झाल्यामुळे जिल्हाधिकारी पदावर डॉ. चंद्रकांत लक्ष्मणराव पुलकुंडवार यांची नियुक्ती झाली. त्यांनी आपल्या पदाचा पदभार  26 एप्रिल 2017 रोजी स्वीकारला. यावेळी मावळते जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना पदाची सूत्रे दिली व जिल्हाधिकारी यांच्या खूर्चीत बसविले.
डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची 18 जून 1993 रोजी उपजिल्हाधिकारी म्हणून प्रशासनात नियुक्ती झाली. त्यांनी परिविक्षाधीन कालावधीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथे तहसीलदार व राळेगांव येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले. तसेच जिल्हा पुनर्वसन अधिकारी पदावरही त्यांनी यवतमाळ येथे काम केले. अमरावती जिल्ह्यात धारणी येथे 1995 ते 1997 मध्ये उपविभागीय अधिकारी, 1999 पर्यंत विशेष भूसंपादन अधिकारी कृष्णा खोरे जालना, त्यानंतर उपविभागीय अधिकारी वसमत जि. हिंगोली, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेत उपायुक्त, 2002 ते 2004 दरम्यान निवासी उपविभागीय अधिकारी नांदेड, त्यानंतर उपविभागीय अधिकारी परभणी, अंधेरी मुंबई येथे एमआयडीसीमध्ये भूव्यवस्थापक, ठाणे जिल्ह्यात महापे एमआयडीसीला क्षेत्रीय अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी अंधेरी, 2008 ते 2010 दरम्यान मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव, 2010 ते 2014 मध्ये आरोग्य मंत्री यांचे खाजगी सचिव, 15 डिसेंबर 2014 ते 5 सप्टेंबर 2015 पर्यंत अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, 30 एप्रिल 2016 पर्यंत उप संचालक भूमी अभिलेख पुणे या पदावर कार्य केले आहे.
तसेच त्यांना 29 मार्च 2016 रोजी आयएएस म्हणून पदोन्नत करण्यात आले. आयएएस म्हणून पहिली नियुक्ती गोंदीया जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर झाली. त्यानंतर बुलडाणा जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाली. ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील आहे. त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे पशु विज्ञान शाखेत पदवी प्राप्त केली. तसेच पदव्युत्तर पदवी पशुविज्ञान (रोगचिकित्सा) शाखेत मिळविली.