Breaking News

जीएसटीसाठी स्वतंत्र कक्ष : टोपे

सातारा, दि. 27 (प्रतिनिधी) : वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायद्याची 1 जुलै 2017 पासून अंमलबजावणी होणार असून या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विक्रीकर विभागाने कोटेकोर नियोजन केले आहे. त्याअनुषंगाने विक्रीकर कार्यालय सातारा येथे विशेष जीएसटी सेल स्थापन केल्याची माहिती सातारा विक्रीकर कार्यालयाचे विक्रीकर उपआयुक्त बी. एम. टोपे यांनी दिली.
विक्रीकर विभाग, केंद्रीय अबकारी विभाग आणि सीमा शुल्क विभाग संयुक्तपणे या कायद्याची अंमलबजावणी करणार आहेत. त्यानुसार विक्रीकर कार्यालय, सातारा येथे विशेष जीएसटी सेल स्थापन केला असून त्याचे पर्यवेक्षण सहाय्यक विक्रीकर आयुक्त हेमंत जाधव करत आहेत. वस्तू व सेवा कराबाबतचे सर्व प्रकारचे प्रशिक्षण सहाय्यक विक्रीकर आयुक्त हेमंत जाधव यांच्या नियंत्रणाखाली पार पाडले जाणार असून, व्यापारी, उद्योजक व नागरिक यांच्यासाठी जागरुकता शिबिराचे आयोजन तालुकावार करण्यात येणार आहे. त्याचे सनियंत्रण विक्रीकर अधिकारी मिलिंद सोनवणे, कु. वर्षाराणी घोलप, अभिजीत भोसले करणार आहेत असेही टोपे यांनी सांगितले.