Breaking News

शिक्षकांच्या प्रयत्नाने रयतेचे मुले घडत आहे - दादाभाऊ कळमकर

अहमदनगर, दि. 21 - शिक्षणापासून वंचित राहिलेल्या वर्गातील मुले गुणवत्ता यादित चमकत आहे. शिक्षकांच्या प्रयत्नाने रयतेचे मुले घडत असून, कर्मवीरांनी पाहिलेले स्वप्न साकार होत आहे. मुलांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी कमी वयातच त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी व संस्कार निर्माण केले पाहिजे. पाया भक्कम असेल तर उंच इमारत उभी राहणार असून, मुलांच्या शिक्षणाच्या जडण-घडणीमध्ये शिक्षकांसह पालकांनी देखील दक्ष राहण्याचे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष दादाभाऊ कळमकर यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचे विद्यार्थी प्रज्ञाशोध व गणित मेरीट फाउंडेशन परिक्षेच्या गुणवत्ता यादित चमकले असता त्यांचा गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात कळमकर बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नवनाथ धुमाळ, बलभीमराव डोके, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, भाऊसाहेब फुलसौंदर, प्राचार्य मंगेश जाधव, संदीप रोहोकले, प्राचार्य टी.पी. कन्हेरकर, मुख्यध्यापक शिवाजी लंके आदिंसह पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकात मुख्यध्यापक शिवाजी लंके यांनी शाळेचा वाढता गुणवत्तेचा आलेख सादर केला. प्रज्ञाशोध परिक्षेत 6 तर गणित मेरीट फाउंडेशन परिक्षेत 84 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले असता उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. नवनाथ धुमाळ म्हणाले की, मुलांवर चांगले संस्कार झाल्यास, या बहरलेल्या वटवृक्षाचे चांगले फळ मिळणार आहे. आई, वडिल व शिक्षक शेवट पर्यंन्त मुलांना शिकवण्याचे प्रयत्न करत असतात. जीवनात यशस्वी होण्यासाठी महान व्यक्तीचा आदर्श व प्रेरणा समोर असली पाहिजे. जन्म मृत्यूच्या मधल्या काळाला जीवन म्हणतात. किती काळ जगले यापेक्षा कसे जगले? याला महत्त्व आहे. जन्माने कुणीही महान नसतो, तर कर्माने महान होता येते. जीवनात यशस्वी होण्यासाठी साधनपेक्षा साधनेची गरज आहे. बिकट परिस्थितीवर मात करुन जिद्द व आत्मविश्‍वासाने यश मिळवता येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच  कोणत्याही कामाला कमी न लेखता प्रत्येक काम उत्तम करण्याचा सल्ला देवून, शिका, वाचा व जिंका या शिवाजी शब्दाचा उलगडा केला.