Breaking News

फ्रान्स राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत मॅकरॉन आणि पेन यांच्यासाठी फेर मतदान

पॅरिस, दि. 24 - फ्रान्सच्या नव्या राष्ट्राध्यक्षांची निवड करण्यासाठी रविवारी पहिल्या फेरीच्या निवडणुका पार पडल्या. त्यात चार प्रमुख उमेदवारांमध्ये मध्यममार्गी इमॅन्युएल मॅकरॉन आणि कडव्या उजव्या विचारसरणीच्या मारिन ल पेन यांना आघाडी मिळाली. मात्र, दोघांपैकी कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यामुळं फ्रान्समधील कायद्यानुसार 7 मे रोजी पुन्हा मतदान होणार असून, त्यात मॅकरॉन विरुद्ध पेन अशी चुरस रंगणार आहे.
राष्ट्राध्यक्षांच्या निवडीसाठी रविवारी मतदान झालं. यावेळी मतदारांकडे एकूण 11 उमेदवारांचा पर्याय होता. यात फ्रेंच टीव्हीनुसार, मॅकरॉन यांना 23.7 टक्के मतं मिळाली. तर ल पेन यांना 21.7 टक्के मतं मिळाली. मतदानापूर्वी झालेल्या सर्वेक्षणानुसार, मॅकरॉन आणि पेन यांना दि रिपब्लिकन्सचे फ्रांस्वा फियो आणि ला फ्रान्स इनसोमाइसचे जा लुक मेलशो हे कडवी झुंज देतील, असं सांगण्यात आलं होतं. पण हे अंदाज खोटे ठरवत मॅकरॉन आणि पेन यांच्यात मुख्य लढत होत आहे. पहिल्या फेरीत कुणालाही बहुमत न मिळाल्याने फ्रान्सच्या कायद्यानुसार 7 मे रोजी पुन्हा मतदान होणार आहे.