Breaking News

अल्पवयीन मुलीची आत्महत्या

 सातारा, दि. 16 (प्रतिनिधी) : सातारा तालुक्यातील वर्णे येथे इयत्ता तिसरीमध्ये शिकणार्‍या आरती विलास गायकवाड (वय 13, रा. वर्णे) या चिमुरडीने गुरुवारी दुपारी पेटवून घेतल्यानंतर शुक्रवारी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोणालाही न सांगता 30 रुपये घेतल्याच्या भीतीपोटी तिने हे कृत्य केले असल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे.
आरतीने कोणालाही न सांगता 30 रुपये घेतले होते. या घटनेमुळे ती कमालीची घाबरली हेाती. या अस्वस्थेतून तिने राहत्या घरी पेटवून घेतले. काळजाचा ठोका चुकवणार्‍या या घटनेत ती 100 टक्के भाजली. गंभीर जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. दुर्दैवाने शुक्रवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला. दरम्यान, अवघ्या 30 रुपयांच्या भीतीपोटी मुलीने पेटवून घेत तिचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार फरांदे तपास करत आहेत.