Breaking News

उरमोडीचे पाणी वडजलपर्यंत नेणार : आ. जयकुमार गोरे

खटाव, दि. 16 (प्रतिनिधी) : उरमोडी योजनेचे पाणी माण तालुक्यातील वडजलपर्यंत नेण्यासाठी माझे प्रयत्न अंतिम टप्प्यात आले आहेत. या योजनेचे 5 पंप सुरु होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी 20 एप्रिल रोजी बैठक घेणार असल्याची माहिती आ. जयकुमार गोरे यांनी दिली.
माण तालुक्यातील किरकसाल, नरवणे, गट्टेवाडी, काळेवाडी, वडजल या भागातील उरमोडी योजनेच्या कॅनॉलच्या कामांची पहाणी करताना ते बोलत होते. यावेळी उरमोडी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. गायकवाड, सहाय्यक कार्यकारी अभियंता प्रविण चावरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन काळे, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, दादासाहेब काळे, आप्पासाहेब बोराटे आणि या भागातील शेतकरी उपस्थित होते.
आ. जयकुमार गोरे म्हणाले, मी आठ वर्षांपूर्वी शब्द दिल्याप्रमाणे उरमोडी योजनेचे पाणी खटाव आणि माण तालुक्यात वेळोवेळी आणण्यात यश मिळविले आहे. आघाडी सरकारच्या काळात 2011-12 मध्ये दुष्काळी परिस्थितीत कण्हेर जोडकालव्याची कामे युध्द पातळीवर करुन उरमोडीचे पाणी खटाव तालुक्यातील येरळवाडी धरणात आणले होते. 24 ऑगस्ट 2014 रोजी किरकसालच्या बोगद्यातून पहिल्यांदा उरमोडीचे पाणी माण तालुक्यात आणून दिलेल्या शब्दाची पूर्तता केली होती. त्यानंतर गरज लागेल तेव्हा हे पाणी माण आणि खटाव तालुक्यात आले आहे. या योजनेच्या कॅनॉल तसेच पंपहाऊसच्या कामांसाठी आपण पाठपुरावा केला. माझ्या कारकिर्दीत उरमोडीसाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करण्यात मला यश आले. किरकसालच्या बोगद्यातून माणगंगा नदीवरील बंधारे भरत उरमोडीचे पाणी म्हसवडपर्यंत नेले आहे. आता हे पाणी 20 किलोमीटर अंतराच्या कालव्यातून वडजलपर्यंत नेण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
आ. जयकुमार गोरे यांनी किरकसाल, गट्टेवाडी, नरवणे, शिंदेवाडी, वडजल या भागातील कामाची पहाणी करुन अधिकार्‍यांना कॅनॉलची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. उरमोडी योजनेचे आणखी पाच पंप चालू करण्यासाठी 20 एप्रिल रोजी बैठक आयोजित केली आहे. उरमोडीचे पाणी पिंगळी तलावात आणण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात असल्याचे आ. गोरे यांनी यावेळी सांगितले.