Breaking News

पाटण शहरात दारूबंदीसाठी महिलांसह ग्रामस्थ आक्रमक

पाटण, दि. 24 (प्रतिनिधी) : राज्य महामार्गालगत असणारी पाटण शहरातील दारूची दुकाने बंद केली आहेत. मात्र 500 मीटर अंतराबाहेर दुकाने पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पाटण शहरात दारूबंदीसाठी पाटण नगरपंचायत हद्दीत दारूविक्रेत्यांना नगरपंचायतीने ना हरकत दाखला, स्थलांतराचा दाखला देवू नये, अन्यथा पाटण शहरातील ग्रामस्थांना रस्त्यावर उतरून आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा पाटण शहरातील विविध संघटनांसह महिलांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
पाटण शहरात 500 मीटर अंतराच्या बाहेर नव्याने सुरू होत असलेल्या दारूविक्री दुकानांना महिलांसह ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. पाटण शहरात दारूबंदीसाठी महिलांनी आवाज उठविला असून दारूबंदीसाठी शासनाने आम्हाला पाठींबा द्यावा. पाटण शहरात दारूबंदीसाठी मतदान घेण्यात यावे, तसेच पाटण नगरपंचायतीने दारू विक्रेत्यांना ना हरकत व स्थलांतराचा दाखला देवू नये, अन्यथा पाटण शहरातील महिला व ग्रामस्थांना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला. निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकासमंत्री, महसूलमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार व नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांना दिल्या. निवेदनावर विश्‍व हिंदू परिषद, शिवसक्षम प्रतिष्ठान, बजरंग दल, डी. के. सामाजिक संस्था, आधार सामाजिक संस्था, सर्मथ सुहास चॅरिटेबल ट्रस्ट, भ्रष्टाचार निर्मूलन समिती आदी संघटनांच्या पदाधिकारी व नागरिकांसह महिलांच्या स्वाक्षर्‍या आहेत.