Breaking News

विनयभंगप्रकरणी खोडद येथील एकास सक्तमजुरीची शिक्षा

सातारा, दि. 24 (प्रतिनिधी) : अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी दाखल असणार्‍या गुन्ह्यात सातारा तालुक्यातील खोडद येथील सतीश अनिल वाघमारे याला येथील न्यायालयाने सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
सातारा तालुक्यातील खोडद परिसरात एक अल्पवयीन बालिका कुटुंबियांसमवेत राहतात. दि. 8 ऑगस्ट 2015 रोजी दुपारी नदीवर कपडे धुण्यासाठी निघाली होती. यावेळी तिला सतीश अनिल वाघमारे याने अडवून तिचा विनयभंग केला. त्या अल्पवयीन बालिकेची वाघमारे छेड काढत असल्याचे पाहून आजूबाजूच्या शेतात काम करणारे त्या बालिकेचे नातेवाईक त्याठिकाणी आले. नातेवाईक येत असल्याचे पाहून वाघमारे हा त्या ठिकाणाहून पळून गेला. यानंतरच्या काळात याची तक्रार त्या बालिकेच्या आईने बोरगाव पोलीस ठाण्यात नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी वाघमारे याला अटक केली. अटकेतील वाघमारे याच्यावरील दोषारोपपत्र उपनिरीक्षक ए. एच. वाघोले यांनी सातारा येथील न्यायालयात सादर केले. साक्षीदारांनी नोंदविलेल्या साक्षी ग्राह्य मानत न्यायालयाने वाघमारे याला सहा महिने सक्तमजुरी, 1 हजार रुपये दंड, दंड न दिल्यास 1 महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सरकारतर्फे अँड़. ज्योती दिवाकर यांनी काम पाहिले. त्यांना प्रॉसिक्यूशनचे उपनिरीक्षक अविनाश पवार, हवालदार शमशुद्दीन शेख, अजित शिंदे, नंदा झांजुर्णे, कांचन बेंद्रे, स्नेहल गुरव, सुनील सावंत यांनी सहकार्य केले.