Breaking News

विद्यार्थ्यांना घडविण्याबरोबर सुसंस्कारित करण्याचे काम प्रा.विधाते यांनी केले - आ.संग्राम जगताप

अहमदनगर, दि. 29 - विद्यार्थ्यांना घडविण्याबरोबर सुसंस्कारित करण्याचे काम प्रा.माणिक विधाते यांनी केले. राजकिय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान असून, राष्ट्रवादी पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी ते सक्षमपणे पेळवत आहे. महाविद्यालया बरोबरच समाजातील होतकरु युवकांना दिशा देण्याचे त्यांचे काम चालू आहे. पक्षासाठी देखील त्यांचे मार्गदर्शन मिळत असून, त्यांना मी गुरुस्थानी मानतो. ते सेवानिवृत्त होत नसून, सामाजिक कार्याच्या दुसर्या विनिंगची सुरुवात करत असल्याची भावना आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केली. 
अहमदनगर महाविद्यालय वाणिज्य विभागाच्या वतीने प्रा.माणिक विधाते यांचा सेवापुर्ती निमित्त सत्कार करण्यात आला यावेळी आ.जगताप बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपप्राचार्य सुनिल कवडे तर याप्रसंगी महाविद्यालयाचे रजिस्टार अरुण बळीद, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, शहर जिल्हाध्यक्ष गौरव ढाकणे, सौ.वसुंधरा विधाते, डॉ.प्रियंका विधाते-चौरे आदि व्यासपिठावर उपस्थित होते.
सौ.संगीता भांबळ यांनी प्रा.विधाते यांच्या कार्यकाळाचा आढावा घेतला. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रा.विधाते यांना मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे नाते विधाते सरांनी निर्माण केले. त्यांची असलेली नम्रतेची वागणुक सर्वांना प्रेरणा देणारी असल्याचे प्रा.कसबेकर यांनी सांगितले. अरुण बळीद म्हणाले की, अहमदनगर महाविद्यालयाच्या जीएस पदी निवड झालेले प्रा.माणिक विधाते याच महाविद्यालयात प्राध्यापक पदाची धुरा प्रामाणिकपणे सांभाळली. दिलेल्या जबाबदारीला प्राधान्यक्रम देवून, त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिल्याचे सांगितले. यावेळी प्रा.रंजना मुळे, डॉ.प्रियंका विधाते-चौरे, कु.निधी चौरे तसेच विद्यार्थी श्रध्दा चोरडिया, अर्चना चाळणकर, सत्यजित कराळे पाटील यांनी प्रा.विधाते यांच्याप्रती मनोगते व्यक्त केली.
प्रा.सुनिल कवडे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी सामुदायिकपणे एखाद्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रम घेणे हे प्रा.विधाते सरांच्या कामाची पावती आहे. शैक्षणिक क्षेत्रात सध्या शिकवण्याचा फार्स चालू असून, प्रा.विधाते यांच्या कार्याची प्रेरणा घेण्यासारखी आहे. तरुणांना शिक्षणाबरोबर दिशा देण्याचे काम त्यांनी केले. त्यांचा कामाचा ठसा व रुबाबदार व्यक्तीमत्वाची छाप नेहमीचे महाविद्यालयाच्या आठवणीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना प्रा.विधाते म्हणाले की, शैक्षणिक क्षेत्रात काम करताना अनेक विद्यार्थी घडविल्याचे समाधान मिळत आहे. प्रयत्नाच्या उंचीने अपयश दूर होत असतात. विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता मिळालेल्या संधीचे सोन करावे. यशस्वी जीवनात अहमदनगर महाविद्यालयाचा मोठा वाटा असल्याचे सांगून, यापुढे सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम चालू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन स्नेहल यादव हीने केले. आभार अजहर शेख यांनी मानले.