Breaking News

सातार्‍यात यशवंतराव चव्हाणांचे स्मारक सभागृह

सातारा, दि. 3 (प्रतिनिधी) : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तथा उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ सातारा येथे स्मारक सभागृह उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून जिल्हाधिकारी अश्‍विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीने मंजुरीसाठी सादर केलेल्या प्रस्तावास ग्रामविकास मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. यासाठी 6 कोटी 69 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे शिल्पकार, सातारा जिह्याचे सुपुत्र व देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक म्हणून देश त्यांच्याकडे पाहतो. मात्र, ज्या सातारा जिल्ह्याचे नेतृत्व त्यांनी देशपातळीवर केले, महाराष्ट्र घडवण्यासाठी योगदान दिले महाराष्ट्रात संसदीय सचिव, अन्न पुरवठा मंत्री, स्थानिक स्वराज्य मंत्री, द्वैभाषिक मुंबई, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदी पदे यशवंतराव चव्हाण यांनी भूषवली. तर केंद्रात संरक्षणमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री, उपपंतप्रधान आणि आठव्या अर्थ आयोगाचे अध्यक्ष अशा जबाबदार्‍या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या. यशवंतराव चव्हाण यांची कारकीर्दच कोणा नेत्याला दीपस्तंभासारखी रस्ता दाखवणारी आहे. त्यांच्या स्मृती जोपासण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेने सातारा येथे यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक उभारण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती. या प्रस्तावास विधी मंडळाच्या 2015-2016 मध्ये झालेल्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात अंशत: मंजुरी देऊन स्मारक सभागृहाचा आराखडा तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी अश्‍विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय स्मारक समिती गठित केली होती. या समितीने सर्वं बाबींचा विचार करून स्मारकाच्या बांधकाम आराखड्यास मंजुरी देऊन 7 मार्च 2017 रोजी प्रस्ताव राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाकडे पाठविला होता. या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय स्मारक समितीच्या बैठकीत कार्येत्तर मंजुरी घेण्याच्या आधीन राहून ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली. यासाठी ग्रामविकास विभागाने थोर व्यक्तींचे स्मारके उभारण्याच्या विशेष कार्यक्रमार्तंगत 7 कोटी 69 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.
ग्रामविकास मंत्रालयाच्या सूचनेनुसार जिल्हास्तरीय स्मारक समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अश्‍विन मुदगल यांच्या नियंत्रणाखाली निविदा काढण्यात येणार आहे. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख या कामाचे नियंत्रक आधिकारी तर जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकार्‍यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.