Breaking News

मतं न देऊनही मुस्लिमांना स्वीकारलं, रविशंकर प्रसाद यांचं वादग्रस्त वक्तव्य

नवी दिर्ल्ली, दि. 22 - मुस्लीम जनता भाजपला मतं देत नाही, पण आम्ही नेहमीच त्यांचा योग्य सन्मान केला आहे, असं वक्तव्य करुन केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नवा वाद निर्माण केला आहे. देशाची संस्कृती आणि विविधता यावर विकासाचा होणारा परिणाम, या विषयावरील ‘माईंड माइन’ संमेलनात रविशंकर प्रसाद बोलत असताना त्यांनी हे विधान केलं.
रविशंकर प्रसाद म्हणाले की, देशातील 13 राज्यांमध्ये आमचे मुख्यमंत्री आहेत. आम्ही देशाचा कारभारही चालवतो आहोत. अशावेळी, उद्योग किंवा सेवा क्षेत्रात काम करणार्‍या कुठल्याही मुस्लीम व्यक्तीला आम्ही त्रास दिला आहे का? आम्ही त्यांना बडतर्फ केलं आहे का? आम्हाला मुस्लीम लोक मतं देत नाहीत, हे मला मान्य आहे. पण आम्ही त्यांना न्यायानंच वागवतोय की नाही?, असा प्रश्‍न रविशंकर प्रसाद यांनी केला.
भाजपच्या विरोधात बर्‍याच काळापासून बदनामीची मोहीम राबवली जात आहे. पण देशातील जनतेच्या आशीर्वादाने आम्ही सरकारमध्ये आहोत आणि इथल्या संस्कृती, विविधेतेला आम्ही वंदन करतो, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. रविशंकर प्रसाद यांच्या वक्तव्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटण्यास सुरुवात झाली आहे. प्रसाद यांच्या वक्तव्याचा एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. आम्हाला घटनेनं अधिकार दिले आहेत. सरकारला फक्त त्याची अंमलबजावणी करायची आहे, असं ओवेसी म्हणाले आहेत.