Breaking News

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी तुषार अरोठे

नवी दिल्ली, दि. 21 - भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी बडोद्याचे माजी फलंदाज तुषार अरोठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला संघाच्या माजी कर्णधार पूर्णिमा राव यांच्या जागी अरोठे यांची नियुक्ती झाली आहे. महिला एकदिवसीय विश्‍वचषक 2017 लक्षात घेता हा बदल करण्यात आला आहे. अरोठे यांनी 2008 ते 2012 या कालावधीत महिला संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपद आणि मुख्य प्रशिक्षकपद भूषवले आहे. महिला एकदिवसीय विश्‍वचषक स्पर्धा संपेपर्यंत अरोथे यांची या पदावर नियुक्ती केली आहे. शनिवारपासून सुरू होणार्‍या महिला प्रशिक्षण शिबिरापासून ते पदभार स्वीकारणार आहेत.
महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मला विचारणा केली. एका राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवण्याची संधी मी कदापि सोडली नसती. त्यामुळे मी माझा होकार कळवला. तसेच, मी याआधीही महिला संघाचा प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे मी या सार्‍या गोष्टींना सरावलो आहे, असे अरोठे म्हणाले.‘मी 2012 साली जेव्हा प्रशिक्षकपद सोडले, तेव्हापासून आतापर्यंत अनेक तरूण महिला क्रिकेटपटू संघात दाखल झाल्या आहेत. सर्व खेळाडू प्रतिभावान आहेत. त्यामुळे आता या संघाला विश्‍वचषक स्पर्धेसाठी तयार करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बाबतीत संघातील खेळाडूंना अधिक मार्गदर्शनाची गरज नाही, मात्र क्षेत्ररक्षण आणि तंदुरूस्तीबाबत त्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे’, असेही अरोठे यांनी नमूद केले.