Breaking News

लोणार तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी

बुलडाणा, दि. 24 - शहरासह तालूक्यात सर्रासपणे सुरु असलेल्या अवैध दारुविक्री व वरली-मटका व्यवसायांवर कारवाई करण्यात येवून सदर धंदे बंद करण्यात यावे, अशी मागणी नागरीकांच्या वतीने ठाणेदारांकडे करण्यात आली आहे. लोणार ठाणेदारांना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद आहे की, लोणार शहरात अवैध व्यवसाय खुलेआम सुरु आहे. दिवसा ढवळया अवैधरित्या दारुचा महापुर वाहत असून वरली-मटकाही जोमाम सुरु आहे. असे असतांनाच 19 एप्रिल रोजी पोलीस प्रशासन व दारूबंदी विभाग बुलडाणाच्या वतीने अवैध दारू विकणार्या येथील शारा रोडवरील हॉटेल व्यावसायिकांवर कार्यवाही करण्यात आली. ही कार्यवाही करीत असतांना एकाच हॉटेल व्यावसायिकाचा फोटो प्रसिद्धीसाठी देण्यात आला. सध्या सर्वत्र हायवेच्या 500 मीटर आत दारू विक्री बंद असतांना लोणार शहरात मात्र दामदुपट्टीने सर्वत्र दारू विक्री सुरू आहे. तसेच वरली-मटका देखील सुरू आहे. असे असताना ठराविक हॉटेलवरच कार्यवाही का? असा प्रश्‍नही निवेदनातून उपस्थित करण्यात आला असून सुरु असलेले अवैध धंदे त्वरीत बंद करण्यात यावे, अशी मागणी देखील सिताराम मापारी, सुभाष मापारी, गजानन मापारी, यादव सावंत, माधवराव शिंदे, प्रसादराव, नारायण मापारी, दिलीप घायाळ, गणेश बलाड, कैलास मापारी यांच्यासह नागरीकांनी  केली आहे.