Breaking News

जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या बिनविरोध निवडी

सातारा, दि. 3 (प्रतिनिधी) : सातारा जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर बैठक बोलवली होती. या बैठकीला सुरुवात झाल्यानंतर तब्बल सव्वा अकराच्या सुमारास परभणीवरुन संघर्ष यात्रेतून थेट जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना फोनवरुन नावे दिली जातात. त्यानंतर विषय समित्यांच्या सभापती पदांचे अर्ज भरण्यास पाठवण्यात आले. पीठासन अधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध झाल्याचे जिल्हा परिषदेच्या सभागृहात जाहीर केले. शिक्षण व अर्थ समितीच्या सभापती पदी राजेश पवार, कृषी सभापती पदी मनोज पवार, महिला व बालकल्याण सभापती पदी वनिता गोरे आणि समाजकल्याण सभापती पदी शिवाजी सर्वगौड यांची निवड झाल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर आमदारांची मुंबईत बैठक झाली होती. बैठकीत झालेला निर्णय उपस्थित आमदारांनी गुलदस्त्यात ठेवला होता. सभापती निवडीसाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या सहीचे व्हीप राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना पोहचले होते.
त्यानुसार सकाळी 9 वाजल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर यायला लागले. 10.20 च्या सुमारास आमदार बाळासाहेब पाटील व मानसिंगराव जगदाळे आले. त्यानंतर आमदार मकरंद पाटील आणि खंडाळा तालुक्यातील दत्तानाना ढमाळ, मनोज पवार आले. खटावचे प्रभाकर घार्गे, नितीन राजगे, तर माणचे शेखर गोरे आणि रेसमध्ये असलेल्या भारती पोळ आणि सोनाली पोळ याही आल्या. माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर हे सर्वात अगोदर अध्यक्षांच्या बंगल्यावर होते. प्रत्यक्ष बैठकीला 11 वाजता सुरुवात झाली. तत्पूर्वी राजकुमार पाटील यांनी अर्ज तयार करुन त्यावर सूचकांच्या सह्या घेवून ठेवल्या होत्या.