Breaking News

अफझलखान कबरीभोवती बांधलेल्या 19 खोल्या पाडण्याचे आदेश : शिंदे

सातारा, दि. 3 (प्रतिनिधी) : प्रतापगड येथील अफझलखान कबरीभोवती वनखात्याच्या जमिनीवर बांधलेल्या 19 अनधिकृत खोल्या पाडण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनविभाग व पोलिसांना दिले आहेत, अशी माहिती शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक, माजी आमदार नितीन शिंदे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली आहे.
शिंदे म्हणाले, विधान भवनात मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनात शिवप्रताप भुमी मुक्ती आंदोलनाचे पदाधिकारी, वनविभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासनाच्या अधिकार्‍यांची बैठक झाली. ही बैठक होण्यापूर्वी मुंबईतील आझाद मैदानावर प्रतापगड येथील अफझलखान थडग्याभोवती वनखात्याच्या जागेवर केलेल्या अवैध बांधकाम मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तत्काळ हटवावे, अफझखान वधाची जागा जनतेला पाहण्यासाठी खुली करावी, या मागणीसाठी आम्ही धरणे आंदोलन केले होते. वनविभागाला उच्च न्यायालयाने दोन वेळा आदेश देऊनही त्याकडे अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे मंत्री मुनगंटीवर यांच्यासोबत बैठकीत सर्व माहिती सांगितली. त्या वेळी वनखात्याच्या मालकीच्या जागेवरील अनधिकृत 19 खोल्यांचे बांधकाम तातडीने हटवावे, अशी सूचना त्यांनी केली.
शिंदे म्हणाले, अफझखान वधाची जागा जनतेला पाहण्यासाठी खुली करावी तसेच या जागेवर अफझलखानाचा वधाचा व सय्यद बंडाचा हात हवेत उडविल्याचे जीवा महाले यांचे शिल्प झाले पाहिजे, अशी आमची मागणी आहे. हे शिल्प म्हणजेच जिवा महाले यांचे स्मारक होय.
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधून 180 कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा प्रतापगडाची डागडुजी करुन येथील प्रत्येक गोष्ट जुन्या पध्दतीने बांधण्यावर खर्च करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.