Breaking News

युवा पिढीच्या पाठीवर शाबासकीची थाप दिल्यास त्यांना प्रोत्साहन मिळते

अहमदनगर, दि. 03 - युवा पिढीला करिअरच्या दृष्टीने सध्याच्या परिस्थितीत विविध क्षेत्रे उपलब्ध झाली आहेत. पूर्वी करिअरसाठी मोजकेच पर्याय उपलब्ध होते. आज प्रत्येकाला स्वतःची आवड निवड असेल, असे क्षेत्र निवडण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा असली, तरी जो मनापासून मेहनत घेईल तो यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. अफजल रंगरेज, महेश गोसावी, जॉय भिंगारदिवे यांनी विविध स्पर्धांत यश संपादन केले आहे. युवा पिढीच्या पाठीवर शाबासकीची थाप दिल्यास त्यांना प्रोत्साहन मिळते, असे प्रतिपादन यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांनी केले.
फिटनेस, मॉडेलिंग व बॉडी बिल्डिंग स्पर्धेत अफजल रंगरेज, महेश गोसावी, जॉय भिंगारदिवे यांनी पदके मिळविल्याबद्दल यशस्विनी महिला ब्रिगेड व ड्यूड अ‍ॅण्ड साई गॅलरीच्या वतीने ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी गॅलरीचे संचालक प्रशांत शिंगवी, स्वप्नील भोसले, श्रीलता आडेप, अविनाश पवार, एकता सुंग, सागर सदलापूरकर, मोहसीन शेख, प्रज्वल भिंगारदिवे, राहुल कराळे, नीलेश आंबेकर, योगेश धामणे, सय्यद, रवी कडारे आदी उपस्थित होते.
प्रशांत शिंगवी म्हणाले की, करिअरसाठी अनेक क्षेत्रे उपलब्ध असली, तरी प्रचंड मेहनतीशिवाय आपण यश मिळवू शकत नाही. कारण सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. फिटनेस, मॉड़ेलिंग व बॉडी बिल्डिंग या क्षेत्रात यश मिळविण्यासाठी खूप सराव करावा लागतो. प्रचंड मेहनतीशिवाय या क्षेत्रात तुम्ही तग धरू शकत नाही. अफजल रंगरेज, महेश गोसावी, जॉय भिंगारदिवे यांनी मिळविलेले समाजातील युवा पिढीला प्रेरणा देणारे आहे, असे ते म्हणाले.