निरा देवघर प्रकल्पग्रस्तांना विशेष बाब म्हणून जमिनीच्या सिंचनासाठी पाणी उचलण्याची परवानगी
पुणे, दि. 28- निरा देवघर प्रकल्पांतर्गत बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना निरा उजवा कालवा आणि वीर धरण जलाशयावरुन विशेष बाब म्हणून पाणी उचलण्याची परवानगी देणे प्रस्तावित असल्याची माहिती निरा देवघर प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, निरा देवघर प्रकल्पामुळे बाधीत झालेल्या बुडीत क्षेत्रातील ज्यांचे पुनर्वसन नवीन गावठाणात खंडाळा आणि फलटण तालुक्यात करण्यात आले आहे. या प्रकल्पग्रस्तांना निरा देवघर प्रकल्पाच्याव्दारे अद्याप सिंचनाचा लाभ मिळू शकत नाही, अशा प्रकल्पग्रस्तांना निरा उजवा कालवा, वीर धरण जलाशयावरुन विशेष बाब म्हणून वरील जमिनींच्या सिंचनासाठी पाणी उचलण्याची परवानगी देण्याचे प्रस्तावित आहे. तरी संबंधित प्रकल्पग्रस्तांनी याबाबत पुढील माहितीसाठी कार्यकारी अभियंता, निरा देवघर प्रकल्प विभाग, सांगवी (भाटघर), ता. भोर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.