शाळेतील पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षक सक्रीय
औरंगाबाद, दि. 28- जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षक मंडळी कार्यरत झाली आहेत. शाळांनी त्यासाठी परफॉर्मन्स कार्ड तयार केली आहेत. वाढलेली पटसंख्या, डिजिटायझेशन व गुणवत्ता ही कार्डमधील माहिती नवीन प्रवेशांसाठी फायदेशीर ठरणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड व शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांच्या संकल्पनेतून आगामी शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद शाळांचीपटसंख्या वाढावी यासाठी झेडपी शाळांचा सकारात्मक आलेख दर्शवण्यासाठी एक बुकलेट तयार करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत परफॉर्मन्स कार्ड तयार करण्यात आले आहे. आपल्या शाळेची प्रगती कोणत्या प्रकारे झाली याच्या नोंदी या कार्डात असून, त्याच्या प्रती पालकांना दिल्या जात आहेत. खाजगी शाळांना स्पर्धेस तोंड देण्यासाठी झेडपीने राबविलेलीही अभिनव संकल्पना प्रभावी ठरत आहे.आगामी शैक्षणिक वर्षात चांगला फायदा दिसून येईल, अशी अपेक्षा शिक्षक भारतीचे प्रकाश दाणे, सुनील चिपाटे, दत्ता गायकवाड, मच्छिंद्र भराडे, नजीर पठाण, महेंद्र बारवाल आदींनी व्यक्त केली. जिल्हा परिषद शाळांमधून मोफत प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रत्येक जिल्हा परिषद शाळेच्या कार्डात तेथील सुविधांची संपूर्ण माहिती असणार आहे. उदाहरणादाखल; धामणगाव येथील झेडपी शाळेने केलेल्या कार्डात फुलंब्री तालुक्यातील मराठी व उर्दू समांतर वर्गांची उपक्रमशील शाळा’ अशी टॅग लाइन दिली आहे. सुविधांमध्ये इमारत, क्रीडांगण, खेळणी, किचनशेड, मुला-मुलींसाठी स्वच्छतागृह, मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश, शिष्यवृत्ती, पोषण आहार, कम्प्युटर लॅब, ग्रंथालय, विज्ञान प्रयोग, आयोजित उपक्रम-ज्ञानरचनावाद पद्धतीने अध्ययन व अध्यापन, कृतीयुक्त शिक्षणातून विद्यार्थ्यांचा विकास, शारिरीक विकासासाठी विविध स्पर्धा. विद्यार्थ्यांचा यशोगाथा दर्शविणारी छायाचित्रे या कार्डात समाविष्ट करण्यात आली आहेत.