Breaking News

संगमनेरात प्रांत कार्यालयावर जागृत महिला मंचचा मोर्चा

अहमदनगर, दि. 25 - तालुक्यातील निमज येथे स्वाती सुरेश बिबवे या महिलेची सासरच्या लोकांनी हत्या केली. या घटनेचा निषेध करत आरोपींना कठोर शासन व्हावे या मागणीसाठी काल जागृत महिला मंचच्यावतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. या घटनेचा निषेध करत आरोपींना शासन करण्याचा ठराव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी करावा अशा सूचनाही याप्रसंगी देण्यात आल्या.
नविन ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरुन पाच लाख रुपये आणू शकत नसल्याच्या रागातून पतीने स्वाती सुरेश बिबवे (वय 22) या महिलेची हत्या केली होती. या घटनेतील नवरा सुरेश, सासरा पंकड आणि दिर अमोल बिबवे या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या क्रुर हत्येचा निषेद करण्यासाठी जागृत महिला मंचच्यावतीने प्रांत कार्यालयावर काल मोर्चा नेण्यात आला.
हा घटला न्यायालयात जलगतीने चालवून आरोपींना कठोर शासन व्हावे, महिला-मुलींवरील अन्याय, अत्याचारांच्या घटनांची तातडीने नोंद घेवून कारवाई करावी, कौटूंबिक हिंसाचार कायद्याची कडक अंमलबजावणी करा, महिलांवरील काद्याची अंमलबजावणी होण्यासाठी अधिकारी कर्मचार्‍यांना निर्देश द्यावे, अशा घटनांमधील आरोपी सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटतात. अशी वेळ येवू नये म्हणून पोलीस प्रशासनाने पावले उचलून तीन वर्षातील घटनांचा आढावा घेवून आरोपींना कठोर शासन होण्यासाठी पावले उचलावीत, महिलांची सुरक्षितात आणि महिलांचा सन्मान हे विषय गांर्भीर्याने हाताळणे गरजेचे आहे. महिला दक्षता तसेच इतर समित्या कार्यरत होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या मोर्चात सुजाता गुंजाळ, उषा सातपुते, संगिता अभंग, नलिनी उणवणे, राधा चव्हाण, स्वाती गव्हाणे, जया कोदे, आशा गाडे, अरुणा जाधव, सिंधूताई पावसे,  अमोल शेळके, राहूल घोलप, अ‍ॅड. ज्योती मालपाणी, हनुमंता उबाळे, अशोक मेडे, गंगाधर चारुडे आदिंसह महिला वर्ग  उपस्थित होत्या. या मोर्चाचे निवेदन  अव्वल कारकून  रासणे यांनी स्विकारले.