Breaking News

निळवंडे धरण कालव्यांच्या निधीसाठी संगमनेरात विराट मोर्चा

संगमनेर (प्रतिनिधी), दि. 24 - निळवंडे धरणाच्या कालव्यांबाबत बनवाबनवी थांबवून कालव्यांना शासनाने तातडीने भरीव निधी द्यावा तसेच त्वरीत हे कालवे पुर्ण करुन दुष्काळग्रस्तांना त्यांच्या हक्काचे पाणी द्यावे या मागणीसाठी माजी महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात, माजी मंत्री मधूकरराव पिचड, आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार वैभवराव पिचड यांच्या उपस्थितीत शेतकर्‍यांचा विराट मोर्चा संगमनेरात काढण्यात आला.
निळवंडे कालवा कृती समिती व लाभ क्षेत्रातील शेतकर्‍यांच्यावतीने आयोजित या मोर्चास यशोधन कार्यालयापासून प्रारंभ झाला. यामध्ये आ.बाळासाहेब थोरात , मधुकरराव पिचड, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. वैभव पिचड, बाजीराव खेमनर, नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे, अ‍ॅड. माधवराव कानवडे, सत्यजित तांबे, रणजितसिंह देशमुख,तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, कृती समितीचे -ज्ञानेश्‍वर वर्पे, उत्तम घोरपडे, नानासाहेब शेळके, रामदास वाघ, मिनानाथ पांडे, अजय फटांगरे, कैलास वाकचौरे, शिवाजीराव थोरात, शंकर खेमनर, सभापती निशाताई कोकणे आदि मान्यवर उपस्थित होते. हा मोर्चा मार्केटयार्ड, बसस्थानक,नविन नगर रोड मार्गे प्रांताधिकारी कार्यालयावर प्रचंड घोषणाबाजी देत दाखल झाला.
याप्रसंगी मोर्चात मार्गदर्शन करतांना आ. थोरात म्हणाले, दुष्काळी भागाला पाणी मिळावे म्हणून निळवंडे धरणाचे काम आपण माजीमंत्री मधुकर पिचड यांच्या सहकार्यातून पूर्ण केले. प्रकल्पग्रस्तांचे संगमनेर, अकोले तालुक्यात आदर्श पुनर्वसन केले. याकामी आमदार पिचड यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी मदत केली. आधी पुर्नवसन मग धरण हा आदर्शवत उपक्रम देशाला दिला. वेळोवेळी प्रश्‍न मांडून मोठ्या प्रमाणात निधी मिळविला. मोठमोठ्या बोगद्यांसह 40 टक्के कालव्यांची कामे पूर्ण केली परंतू मागील 3 वर्षांपासून निधी अभावी ही कामे बंद पडली आहे. कालव्यांच्या निधीसाठी सातत्याने आग्रही पाठपुरावा केला. विधानसभेत आवाज उठविला. संबंधीत खात्याच्या मंत्र्यांनीही विधानसभेत 2 महिन्यात निधी देवू कालवे पूर्ण करु असे खोटे आश्‍वासन दिले. मंत्री एक बोलतात. राज्यमंत्री दुसरेच बोलतात. हा त्यांच्या बनवाबनवीचा खेळ चालला आहे. आम्ही धरण पूर्ण केले.  कालव्यांची कामे  केली म्हणून हक्काने सांगतो. यांचा या कामाशी संबंध नाही ते फक्त बातम्या देवून श्रेय मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. किती खोट्या बातम्या द्या, जनतेला आता त्या पटणार नाही. अकोले तालुक्याने सातत्याने आपल्याला मदत केली आहे.  या कालव्यांसाठी कृती समितीने ही सतत पाठपुरावा केला. त्यांचे काम कौतुकास्पद आहे. मात्र सत्ताधारी काही मंडळी बनवाबनवी करु पाहत आहे. आता कारणे सांगू नका निधी द्या. आमच्या हक्काचे पाणी आम्हाला लवकरात लवकर मिळाले पाहिजे. या आंदोलनाला युवकांसह सर्वांनी एकत्र येवून मोठया संख्येने लढावे लागेल. हक्काचे पाणी तळेगावसह दुष्काळी भागाला दिल्याशिवाय आता थांबणार नाही असे ही ते यावेळी म्हणाले.
याप्रसंगी मधुकरराव पिचड म्हणाले,  तळेगाव, रांजणगाव या दुष्काळी भागासह उत्तर नगर जिल्ह्याला पाणी देण्यासाठी निळवंडे धरण पूर्ण केले.आमदार बाळासाहेब थोरात व आपण या धरणासाठी सातत्याने पुढाकार घेतला. या कामासाठी सुमारे 850 कोटींचा निधी आपण आणला. या खोटारड्या सरकारने 13 कोटी देवून आपली टिंगल केली आहे. अच्छे दिन म्हणणार्‍यांनी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना रस्त्यावर आणले. निळवंडे धरणाच्या कामासाठी फक्त संगमनेर तालुका व आमदार थोरात यांनीच मदत केली. त्यांनी स्व:ताची 5 एकर जमीन दिली. प्रकल्पग्रस्तांचे पूर्नवसन केले बाकीचे मात्र खोट्या बातम्या देतात. बाकीच्यांची ही काहीही मदत झाली नाही. सद्याचे सत्ताधारी पक्षाचे खासदार, आमदार फोटो, रॅली काढतात.यांचे काहीही योगदान नाही. मुख्यमंत्री समृध्द महाराष्ट्रासाठी 70 हजार कोटी देतात. पण आपल्याला कालव्यांसाठी 700 कोटी ही देवू शकत नाही. सद्याच्या सरकारच्या मंत्र्यांचे डोके फिरले आहे ते भेदभाव करतात. अकोले तालुक्याने कालव्यांना कधीच विरोध केला नाही. आ. थोरात व आमदार पिचड यांनी एकत्र कालव्यांसाठी अनेक वेळा पाठपुरावा केला. मात्र सरकार दिशाभूल करत आहे. आपल्याला ही लढाई अधिक तीव्र करावी लागेल. येत्या 1 मे ला महाराष्ट्र दिनी सर्व गावांनी ग्रामसभेत रा कालव्यांना निधी मिळावा यासाठी ठराव करुन सरकारवर दबाव वाढवावा. आंधळे व बहिरे झालेल्या या  सरकारला जनता कधी ही माफ करणार नाही असे ही ते म्हणाले.
आ. डॉ. सुधीर तांबे म्हणाले, निळवंडे धरण हे आमदार थोरात व आमदार पिचड यांनी आपले राजकीय वर्चस्व पणाला लावून पूर्ण केले. सहकारमर्षी भाऊसाहेब थोरात यांनी शरद पवार यांच्या कडून उजवा कालवा पूर्ण करुन घेतला. भंडारदरा व निळवंडे मिळून 20 टीएमसी पाणी उत्तर नगर जिल्ह्याचे आहे व ते मिळालेच पाहिजे.सद्याचे सरकार कर्जमाफी देत नाही. शाश्‍वत शेती म्हणतात. मग निळवंडे धरणासाठी निधी का नाही? सरकारने जाणीवपूर्वक या धरणाच्या कालव्यांकडे दुर्लक्ष केल्याचा थेट आरोप ही त्यांनी यावेळी केला.
यावेळी आमदार पिचड म्हणाले, आमदार थोरात व माजीमंत्री पिचड यांच्यामुळे निळवंडे धरण पूर्ण केले. अकोले तालुक्यातील जनतेने कायम धरण व कालव्यांसाठी पाठिंबा दिला. भाजप व सेनेचे मंत्री अकोला एक संगमनेर एक बोलतात. मी व आमदार थोरात यांनी कालव्यांच्या निधीसाठी एकत्र आवाज उठविला. ब्रिटीशांप्रमाणे तोडा व फोडा निती करुन सध्याचे सरकार राज्य करु पाहत आहे. अकोले व संगमनेरमध्ये तेढ निर्माण करतात. पण संगमनेर व अकोले कायम विकासासाठी एकत्र येवू असे ही ते म्हणाले.
यावेळी ज्ञानेश्‍वर कर्पे म्हणाले, चार मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केले हे एकमेव धरण आहे. अनेक दिवसांपासून काम रेंगाळलेले आहे. मात्र सरकार काही मंडळी पाणी रेवू नाही यासाठी षडमंत्र रचले. दुष्काळी जनता एकवटली आहे. वेळीच दखल घ्या नाहीतर मोठा अनर्थ घडेल याची सर्व जबाबदारी सरकारची राहिल असे ही ते म्हणाले.
याप्रसंगी हिरालाल पगडाल, उत्तमराव घोरपडे, नानासाहेब शेळके, लक्ष्मण गागरे यांचीही भाषणे झाली. यावेळी आबासाहेब थोरात, महेंद्र गोडगे, सौ.अर्चना बालोडे, भाऊसाहेब कुटे, सिताराम राऊत, नवनाथ अरगडे, बाबा खरात, सतिष कानवडे, सौ. निर्मलाताई गुंजाळ, बबन राऊत, दत्तु खुळे, राजेंद्र गुंजाळ आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, कालव्याचे अधिकारी रविंद्र बागुल, संगीता जगताप यांनी निवेदन स्विकारले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केले.  यावेळी 182 गावांतील शेतकरी, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.