Breaking News

झुणका भाकरी केंद्रातील साहित्य नेण्यावरून तणाव

सातारा, दि. 24 (प्रतिनिधी) : सातारा मध्यवर्ती बसस्थानकातील दलित महिला विकास महामंडळ चालवत असलेले झुणका भाकर केंद्र एसटी प्रशासनाने जमीनदोस्त केल्यानंतर आतील साहित्य नेण्यासाठी आलेल्या महामंडळाच्या महिलांना एसटीच्या अधिकार्‍यांनी अटकाव केला. त्यावरुन महिला व अधिकारी यांच्यामध्ये जोरदार वादावाद झाला. संबंधित संस्थेच्या महिलांनी दोन ट्रॅक्टर लावून आपले साहित्य नेले. 
सातारा बसस्थानकात सातारा पाहुणचार हे झुणका भाकर केंद्र अ‍ॅड. वर्षा देशपांडे दलित महिला विकास महामंडळामार्फत चालवत होत्या. मात्र, दलित महिला विकास महामंडळ व एसटी प्रशासन यांच्यात झुणका भाकर केंद्रावरुन न्यायालयात वाद होता. दोन महिन्यांपूर्वी एसटी प्रशासनाच्या बाजूने न्यायालयाचा निकाल लागला होता. त्यानंतर तहसीलदारांच्या उपस्थितीत या केंद्राचा एसटीच्या अधिकार्‍यांनी ताबा घेतला होता. मात्र, ताबा घेतल्यानंतर झुणका भाकर केंद्रातील महिलांनी येथे ठिय्या मांडला होता. मंगळवारी रात्री उशिरा एसटीच्या प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने हे केंद्र जमीनदोस्त केले.
झुणका भाकर केंद्रातील महिला या केंद्रातील वस्तू व अन्य साहित्य बाहेर काढून नेण्यासाठी आल्या होत्या. याची कानकुन सातारा आगाराच्या वरिष्ठ आगारप्रमुख निलम गिरी यांना लागली. त्यांनी घटनास्थळी आगारातील अधिकारी व कर्मचार्‍यांसमवेत धाव घेत साहित्य हटवता येवू नये यासाठी दोन नादुरूस्त बसेस आडव्या उभ्या केल्या. त्यानंतर गिरी यांनी याबाबतची माहिती विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर व अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांना दिली. काही वेळात विभागीय कार्यालयातील सुरक्षा अधिकारी भारती व अन्य अधिकारी, कर्मचारी केंद्राजवळ आले. त्यांनी महिलांना झुणका भाकर केंद्रातील साहित्य नेण्यास विरोध केला. यावेळी अधिकारी व महिलांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. हा प्रकार पाहून ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टर घेवून निघून गेला. बाचाबाचीचे प्रकरण हातगाईवर आल्यानंतर आगारातील अन्य अधिकार्‍यांनी हस्तक्षेप केला. यावेळी अ‍ॅड. शैला जाधव यांनी झुणका भाकर केंद्राची इमारत आमची आहे. आमचे साहित्य आहे ते आम्हाला बाहेर काढायचे आहे. तीन लाखाचे फ्रीज व अन्य साहित्य आहे. साहित्य हटवता येवू नये म्हणून मुद्दाम एसटी लावली आहे. ही तुमची पध्दत चुकीची असल्याचे अ‍ॅड. जाधव यांनी निलम गिरी यांना ठणकावून सांगितले.
दरम्यान, गिरी यांनी तुम्ही लेखी पत्र द्या असे सांगितले. या कालावधीत झुणका भाकर केंद्रातील महिलांनी दोन्ही ट्रॅक्टर बसस्थानकात आणण्याचा प्रयत्न केला. या ट्रॅक्टरला सुरक्षा रक्षक आत येवू देत नव्हते. शेवटी महिला आक्रमक झाल्या. त्यानंतर हे ट्रॅक्टर आत आणून साहित्य भरण्यात आले.