अभिनेते के. विश्वनाथ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली, दि. 25 - लोकप्रिय तेलुगु अभिनेते व निर्माते कसीनथुनी विश्वनाथ यांना 2016 सालचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. विश्वनाथ यांच्या सप्तापदी व संकराभरणम् या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटातील भूमिका विशेष गाजल्या. त्यांना यापूर्वी भारत सरकारकडून पद्मश्री या प्रतिष्ठेच्या पुरस्कारानेही गौरवले आहे. 3 मे रोजी विज्ञान भवनात होणा-या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या प्रदान सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते विश्वनाथ यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारात एक सुवर्णकमळ, 10 लाख रुपये रोख व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री वैकेय्या नायडू यांनी आज दादासाहेब फाळके पुरस्कार समितीमार्फत करण्यात आलेल्या शिफारशीस मंजुरी दिल्याने, या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. 1956च्या दरम्यान निर्माते म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरूवात करणा-या विश्वनाथ यांनी तब्बल 50 चित्रपट केले.