Breaking News

पिंपरी पालिका सभागृहातून विरोधी पक्षनेत्यांसह राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक निलंबित

पुणे, दि. 21 - पिंपरी महापालिका सर्वसाधारण सभेत 100 टक्के शास्तीकर माफ करण्यासाठी महापौरांच्या आसनासमोर गोंधळ घालणारे विरोधी पक्षनेते योगेश बहल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांना पुढील तीन सर्वसाधारण सभांसाठी आज (गुरुवारी) निलंबित करण्यात आले. निलंबन कारवाईनंतर सभागृहाबाहेर पडणार्‍या महापौर नितीन काळजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी घेराव घालण्याचा प्रयत्न केला. निलंबन कारवाई मागे घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौर कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे.
विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम तसेच नगरसेवक दत्ता साने व मयूर कलाटे अशी निलंबित करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची नावे आहेत.
पिंपरी महापालिकेत आज सर्वसाधारण सभेच्या वेळी शास्तीकराचा प्रश्‍न विषयपत्रिकेवर असताना, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी 100 टक्के शास्तीकर माफ करण्यात यावा यासाठी महापौरांच्या आसनासमोर जोरदार निदर्शने करत आंदोलन केले. यावेळी भाजप नगरसेवकांनी देखील घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहात गोंधळ होऊन तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
यावेळी शास्तीकराच्या 100 टक्के माफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे विरोधी पक्षनेते योगेश बहल, मंगला कदम, मयूर कलाटे व दत्ता साने या चारही नगरसेवकांवर पुढील तीन सर्वसाधारण सभांसाठी निलंबित करण्यात आले.