Breaking News

सातारा जिल्ह्यातील 26 हॉस्पिटलमध्ये अनियमितता

सातारा, दि. 5 (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील गर्भपाताच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यातील हॉस्पिटल तपासण्याची धडक मोहीम आरोग्य विभागाने राबवली असून आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे 161 हॉस्पिटलची तपासणी करण्यात आली आहे. पथकाला सातारा, खटाव व कराड तालुक्यातील 26 हॉस्पिटलमध्ये अनियमितता व त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे आरोग्य विभागाने या हॉस्पिटलवर कारवाईचा बडगा उगारल्याने आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
म्हैसाळ येथील प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात कार्यरत असणार्‍या रूग्णालये व दवाखान्यांची तपासणी करण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. 15 एप्रिलपर्यंत ही मोहीम जिल्ह्यात राबवली जाणार आहे. नागरी व ग्रामीण या दोन्ही स्तरांवर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आरोग्य विभाग तसेच अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत राबवण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम राबवण्यात येत आहे. ग्रामीण भागात तालुका आरोग्य अधिकारी, उपजिल्हाधिकारी व पोलीस उपअधीक्षकांचे तर शहरी भागात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यात 1 असे मिळून 11 पथके तर शहरी भागात 4 असे मिळून 15 पथकांमार्फत तपासणी करण्यात येत आहे.
आतापर्यंत सातारा 31, महाबळेश्‍वर 7, वाई 13, खंडाळा 13, फलटण 2, माण 5, खटाव 31, कोरेगाव 16, कराड 21, पाटण 22 अशा मिळून 161 हॉस्पिटलची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये दवाखाना, रूग्णालयात कार्यरत असणार्‍या डॉक्टरांची पदवी आणि त्यांच्या पदवीस अनुसरून असलेल्या परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र, कार्यरत परिचारीकांची पदविका, पदवी आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र, रूग्णालयात सर्व फार्मासिस्टची पदवी आणि त्यांच्या पदवीला अनुसरून असलेले नोंदणी प्रमाणपत्र, बायोमेडिकल वेस्ट संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र, दवाखान्यात बाह्यरूग्ण, आंतररूग्ण, शस्त्रक्रियागृह, बाळंतपणाचा कक्ष,  प्रयोगशाळा, क्ष किरण विभाग, सोनोग्राफी, सीटी स्कॅन विभाग, मेडिकल स्टोअर, रूग्णालयातील  डॉक्टर्स त्यांच्या पदवीला अनुसरून रूग्णांना औषधे देतात का? यांसह अन्य माहिती पथकामार्फत घेण्यात येत आहे.
आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार तपासणीत सातारा जिल्ह्यातील 26 हॉस्पिटलमध्ये तपासणी पथकाला अनियमितता व त्रुटी आढळून आल्या आहेत. त्याचा अहवाल समितीने आरोग्य विभागास सादर केला आहे. या हॉस्पिटलच्या तपासणीदरम्यान नियमबाह्य कामकाज चालत असल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाच्या सूचनांनुसार अनियमितता आढळून आलेल्या हॉस्पिटलवर कारवाई करण्यात येणार आहे.