उटी येथील आगीत 11 घरे व 4 गोठे भस्मसात
जिवीतहाणीमध्ये 2 बैल, 4 बकर्या, कोंबड्यांसह 21 लाख रुपयाची वित्तहाणी
बुलडाणा, दि. 03 - जानेफळच्या दक्षिणेस असलेल्या ग्राम उटी गावाला काल 1 एप्रिलच्या रात्री 11 वाजेच्या सुमारास आग लागली. यावेळी वारा जोरात असल्याने काही क्षणातच आगीने उग्ररुप धारण केले व यात 11 घरे आणि 4 गुरांचे गोठे जळून खाक झाले. यामध्ये जिवीत हानीसह जवळपास एकूण 21 लाखांच्या वर नुकसान झाल्याचे महसूल अधिकार्यांनी सांगीतले.याबाबत सविस्तर वृत्त असे की, 1 एप्रिल 2017 रोजी रात्री 10.30 वाजता उटी येथील ग्रामस्त नेहमी प्रमाणे झोपत असतांना उटी गावाच्या पश्चिम भागाकडील वस्तीला अचानक आग लागल्याने जोरात पश्चिम ते पुर्व वारा असल्यामुळे आगीने उग्र रुप धारण केले. यात चांद खॉ इनायत खा यांच्या गोठ्याला आग लागल्याने गोठ्यामधील कुटार, 2 बैल, 4 बकर्या जळून खाक झाल्या. इतर नजीकच्या घरांना आग लागल्याने घरातील झोपलेल्या लोकांनी आगीच्या उष्णतेने व जळालेल्या वासाने कर्तव्य दक्ष व समयसुचकतेने आपले व कुटूंबातील सदस्यांचे प्राण वाचविले. आरडा ओरड केल्याने गावातील लोकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नजीकच राहत असलेल्या युनूस खॉ पठाण यांनी स्वतःचे घरातील 7 बोअर सुरू केले तर गावातील हनिफ शे. शब्बीर, दिकप गव्हाळे, तुकाराम शेळके, गुलाब दाभाडे, शे.रज्जाकभाई, शे.हबीबभाई, संदीप सुडोकार, यांनी एकूण 15 बोअर तसेच संजय सुळकर व गजानन तुळशीराम चांदणे यांनी आपल्या विहीरीवरील मोटार पंप सुरू करुन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतू नैसर्गीक आपत्तीसमोर सर्व प्रयत्न असफल होत असल्याने लक्षात येताच गावातील सामाजीक कार्यकर्ते, नेते, ग्रामसेवक एस.टी.मोरे याीं पोलीस स्टेशन जानेफळ, तहसिलदार संतोष काकडे, तलाठी एच.आर.बोरे यांना घटनेची माहिती कळविली. तहसिलदार यांनी तत्काळ आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मेहकर, चिखली व खामगांव येथील अग्नीशामक दलास पाचारण केले. यावेळी अग्नीशामक दलांच्या अथक प्रयत्नाने जवळपास रात्री 3 वाजेदरम्यान सदर आगीवर संपुर्णपणे नियंत्रण मिळविण्यात आले. यावेळी मोठी हानी टळल्याने उटी वासीयांनी सुटकेचा श्वास घेतला. जवळपास 3.30 तास आगीचा तांडव गावात सुरु होता.
कर्तव्यदक्ष तहसिलदार यांनी समयसुचकता दाखवत रात्रीच मंडळ अधिकारी तलाठी यांच्यासह घटनास्थळ गाठले. 2 एप्रिलच्या सकाळी अधिकार्यांनी पंचनामा केला असता. या आगीमध्ये 11 घरे, 4 गुरांचे गोठे, जळून खाक झाले तर 2 बैल, 4 बकर्या व काही कोंबड्या आगेत जळून खाक झाले. पंचनामा करण्यासाठी काहिही एक शिल्लक उरले नाही. जिवीत हानीसह एकूण 21 लाख रुपयांची वित्तहाणी झाल्याचा अहवाल तससिलदार संतोष काकडे यांनी पाठविला.
उटी येथे झालेल्या घटनेची माहिती कळताच आजुबाजुचे सामाजीक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, यांनी घटनास्थळी भेटी दिल्या तर काही जागृत जनता मानवधर्म दाखवित मुलभूत गरजेच्या वस्तु पुरविण्यासाठी समोर येत आहेत.
खासदार प्रतापराव जाधव, तात्या वाळूकर, विश्वासराव सवडतकर, हिम्मतराव आवले, पं.स.सभापती सौ.जया खंदारे, कैलास खंदारे, सर्व पं.स. व जि.प.सदस्य यांनी भेटी दिल्या असता खासदार यांनी मुख्यमंत्री फंडातुन जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असे आश्वासन दिले.
