Breaking News

सह्याद्रीत व्याघ्र प्रकल्पाच्या पाणवठ्यांवर 10 मे रोजी गणना

कराड, दि. 28 (प्रतिनिधी) : हवेतील गारवा, नभात चमचमतं चांदणं, शीतल चंद्रप्रकाशात पाणवठ्यावरील सुरक्षित मचानावर बसून वन्यजीवांना जवळून पाहण्याची संधी लवकरच वन्यजीवप्रेमींना मिळणार आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी या चार जिल्ह्यांत पसरलेल्या सुमारे एक हजार चौरस किलोमीटर क्षेत्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बौध्द पौर्णिमेला वन्य प्राण्यांची गणना होणार आहे. यावेळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये पहिल्यांदाच वन्यजीवप्रेमींना गणनेत सशुल्क सहभागी होता येईल. 10 ते 11 मे दरम्यान सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पाणवठ्यांवर गणना होणार आहे. 
दिवसभर दाट जंगलातील, आपल्या अधिवासात राहणारे वन्यप्राणी रात्रीच्या अंधारात पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर येतात. उन्हाळ्यात जंगलात पाण्याचे दुर्भिक्ष असते. केवळ बारमाही पाणवठेच जिवंत असतात. अशा पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांची गणना करणे सोपे जाते. त्यात बौध्द पौर्णिमेला पुरेसा चंद्र प्रकाश असतो. अशा वातावरणात वन्यप्राण्याला पाहून त्यांची नोंद करणे शक्य असते. त्यामुळे हा दिवस प्रगणनेसाठी निवड आहे.
वन्य जीव विभागाच्या कर्मचार्‍यांमार्फत ही गणना केली जायची. त्यांच्या मदतीला म्हणून आवाहन करून स्वयंसेवक घेतले जायचे. मात्र, काही वर्षांपूर्वी विचित्र अनुभवांमुळे स्वयंसेवकांचा सहभाग थांबविण्याचा निर्णय शासनाने घेतला. तेव्हापासून वन्य जीव विभागाचे कर्मचारी या गणनेत सहभागी होत असत. यावेळी प्रथमच स्वयंसेवकांचा सहभाग वाढविण्याचा निर्णय सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने घेतला आहे. मात्र, स्वयंसेवकांना त्याकरिता पैसे मोजावे लागतील. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पाणवठ्यांवर मचान बांधण्यात येत आहेत. मचान झाडाच्या फांद्यांनी झाकोळलेले असते. त्यामुळे प्रगणकाला प्राणी व्यवस्थित पाहता येतील. मात्र प्राण्यांना प्रगणक दिसणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या व्यवहारात कोणताही हस्तक्षेप होणार नाही, अशी व्यवस्था करण्यात येते. पाणी पिण्यासाठी आलेल्या वन्यप्राण्यांचे निरीक्षण, त्यांची गणना मचानावर बसून केली जाईल. 10 मे रोजी सायंकाळी सहा ते दुसर्‍या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत ही गणना केली जाणार आहे. वन्य जीव विभागाचे कर्मचारी, कुंडल (सांगली) येथील वनक्षेत्रपाल प्रशिक्षण केंद्रातील उमेदवार व वन्यजीव विभागाकडे नावनोंदणी करणारे निवडक स्वयंसेवक या गणनेत सहभागी होतील. एक कार्यशाळा घेऊन स्वयंसेवकांना त्यांच्या कामाची रूपरेषा, जबाबदारी, जंगलातील वर्तन, काय करावे व काय करू नये, याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल, अशी माहिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक डॉ. विनिता व्यास यांनी दिली.