Breaking News

उष्माघाताचा दुसरा बळी, धुळ्यात माजी सरपंच महिलेचा मृत्यू

धुळे, दि. 30 - धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात उष्माघातामुळं महिलेचा मृत्यू झाला आहे. बाभुळदे गावात 49 वर्षीय माजी महिला सरपंच मालती निकुंभे यांचा उष्माघातानं मृत्यू झाला. काल बीडमध्ये राज्यातील उष्माघाताचा पहिला बळी गेला होता. त्यानंतर धुळ्यात उष्माघातानं महिलेचा मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून धुळ्याचं तापमान 43 अंश सेल्सियसवर जातं आहे. त्यामुळं या वाढत्या तापमानाचा आता वयोवृद्ध, लहान बालकं आणि महिलांना त्रास होत असल्याचं चित्र आहे.
दुसरीकडे नाशिकचाही पारा यंदा चांगलाच वाढला आहे. शहरातील तापमानात सातत्यानं वाढ होत असल्यानं आता त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. उन्हाच्या तडाख्यामुळं शहरातील तापमानानं चाळीशी गाठली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नाशकातील शाळांचा वेळ बदलण्याची शक्यता आहे. दुपार सत्रातील शाळांच्या वेळापत्रकात बदल करुन त्या सकाळ सत्रात भरवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तसंच वाढत्या तापमानामुळं पुढील 72 तास नागरिकांना सावधानतेचा इशाराही प्रशासनाच्या वतीनं देण्यात आला आहे.