Breaking News

कार्यकर्ते म्हणाले तरच आघाडी, अन्यथा काँग्रेसही स्वबळावर- आ. अमित देशमुख

लातूर (प्रतिनिधी), दि. 29 - लातूर महानगरपालिका निवडणुकीत समविचारी पक्षासोबत आघाडी करण्याबाबत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार केला जाईल. कार्यकर्ते म्हणाले तर आघाडी होईल ते नको म्हणाले तर स्वबळावर लढू असे स्पष्ट विधान आ. अमित देशमुख यांनी केले. आज काँग्रेस भवनात उमेदवारीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मुलाखती सुरु आहेत. काल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी काँग्रेससोबतच्या आघाडीबाबत वक्तव्य केलं होतं. काँग्रेसकडून सन्मानजनक प्रस्ताव आल्यास आघाडी करु अन्यथा सगळ्या जागा स्वबळावर लढू असं मुंडे म्हणाले होते. त्याचाच धागा पकडून आ. अमित देशमुख यांनी आघाडीचा चेंडू काँग्रेस कार्यकर्त्यांच्या कोर्टात टाकला आहे.
सुरुवातील आ. देशमुख यांनी गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. नवे वर्ष सुख समाधानाचे आणि ‘काँग्रेसचे’ जावो असं ते म्हणाले. काँग्रेसने लातुरात केलेली कामे नगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेवकांनी केलेली कामे लक्षात घेता इथला मतदार नक्कीच चांगल्या कामांची पावती देईल असा आत्मविश्‍वास वाटतो. येत्या 19 एप्रिलला काँग्रेसचा विजयी संकल्प होईल आणि 21 तारखेला विकासाची गुढी उभा केली जाईल असे आ. देशमुख यांनी ठामपणे सांगितले.
महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला रामराम केला. अख्तर शेख, सुरेश पवार, राजू आकनगिरे, राजू आवसकर ही मंडळी भाजपात गेली. ही पडझड कशी रोखणार असा प्रश्‍न केला असता, अजून भाजपाची उमेदवारी जाहीर झालेली नाही. या मंडळींना तिकिटे मिळतीलच याची खात्री नाही, ते परतही येऊ शकतात असा मुद्दा त्यांनी मांडला. काँग्रेसमध्ये जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा विचार केला जातो. कार्यकर्ते म्हणाले तरच राष्ट्रवादीशी-समविचारी पक्षाशी आघाडी केली जाईल अन्यथा आम्ही आमचे लढू असे आ. देशमुख यांनी सांगितले.