Breaking News

चाफळमध्ये सीतामाईच्या यात्रेत महिलांची गर्दी

चाफळ, दि. 16 (प्रतिनिधी) : तिळगूळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत महाराष्ट्राच्या असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या चाफळ (ता. पाटण) येथील  श्रीराम मंदिरात सीतामाईची यात्रा उत्साही वातावरणात झाली. यादिवशी लाखो महिलांनी सुगड लुटण्यासाठी गर्दी केली होती.
श्रीराम मंदिरात आदल्या दिवशीच अनेक भाविकांनी हजेरी लावली होती. पहाटे 5 वाजता मंदिरात पूजा व आरतीसाठी अनेक महिलांनी गर्दी केली होती. दुपारी 1  वाजता मंदिर परिसरात उभे राहण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. महिला मिळेल त्या जागेत विडे मांडून पूजन करत होत्या.
संक्रांती दिवशी सीतामाईंचे दर्शन घेऊन सौभाग्याचा वसा तिच्याकडून घेतल्यास सौभाग्य अखंड टिकते, अशी श्रध्दा आहे. वसा घेणारी महिला 3 वर्षे सलगपणे  चाफळ येथे येते. आजपर्यंत सुमारे दीड लाख महिलांनी हे व्रत धारण केले असून मंदिरात उपस्थिती लावली. श्रीराम देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायत यांच्यातर्फे  पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. त्याचप्रमाणे चारचाकी वाहने पार्किर्ंगची सोय नारळीच्या बागेत व गावापासून अर्धा कि. मी. अंतरावर केली होती.  यात्रेत येणार्‍या महिलांना रांगेतून मंदिरात प्रवेश करण्यासाठी देवस्थान ट्रस्टने व्यवस्था केली होती. शालेय विद्यार्थी महिलांना मंदिरात जाण्यासाठी सहकार्य  करताना दिसत होती. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सपोनि कुमार घाडगे यांच्या नेतृत्वाखाली चाफळ, उंब्रज पोलिसांनी चोख बंदोबस्त  ठेवला होता.