Breaking News

जयश्री इलेक्ट्रॉन कंपनी कामगारांचे वेतनवाढीसाठी धरणे आंदोलन

पुणे, दि. 17 - भोसरी एमआयडीसी, जे ब्लॉकमधील जयश्री इलेक्ट्रॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून वेतनवाढ मिळत नसल्याच्या निषेधार्थ कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कंपनीतील कामगारांनी वेतनवाढ आणि कंपनी मालकाकडून चांगली वागणूक मिळावी, या मागणीसाठी शनिवारपासून (दि. 14) बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कंपनीसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. 
महाराष्ट्र राज्य औद्योगिक कामगार महासंघ आणि भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली कामगारांनी हे आंदोलन सुरू केले आहे. जयश्री इलेक्ट्रॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मालकांकडून नेहमीच अपमानास्पद वागणूक दिली जाते आणि अरेरावीची व धमकीची भाषा वापरतात, असा आरोप कामगारांनी केला आहे.
वेतनवाढीची मागणी केल्यास महागाईला सरकार जबाबदार असल्यामुळे मी पगारवाढ करू शकत नसल्याचे उत्तर मालकांकडून मिळत असल्याचे कामगारांनी सांगितले. तसचे वेतनवाढीसाठी कामगार संघटनांसोबत चर्चा करण्यास कंपनी मालक टाळाटाळ करत असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. त्यामुळे कामगारांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर शनिवारपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे.