Breaking News

देशाच्या विकासासाठी सहकार चळवळ बळकट केली पाहिजे

पुणे, दि. 17 - भारत हा जगातील सर्वाधिक मोठी सहकार चळवळ असलेला देश आहे. साखर उद्योग आणि मासेमारी, दुग्धव्यवसायात प्रगती होत आहे. त्यामुळे कॅशलेस योजना सहकार आणि ग्रामीण भागात यशस्वी राबविल्यास भ्रष्टाचाराला आळा बसण्यास नक्की मदत होईल. त्यामुळे देशाच्या एकूण विकासासाठी सहकार चळवळ बळकट केली पाहिजे, असे मत केंद्रीय कृषी व विकास कल्याण मंत्री राधा मोहन सिंह यांनी व्यक्त केले.
वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थानच्या (वैमनिकॉम) 50 व्या वर्धापनदिन समारंभात सिंह बोलत होते. याप्रसंगी भारतीय सहकारी संघ आणि राष्ट्रीय सहकारी प्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष, खासदार डॉ. चंद्रपाल सिंह यादव, खासदार अनिल शिरोळे, भारतीय सहकारी संघाचे उपाध्यक्ष डॉ. विजेंदर सिंह, संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एन. सत्यनारायण, सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अ‍ॅन्ड इकोनॉमिक्सचे संचालक प्रा. राजेश परचुरे उपस्थित होते. डॉ. राधा मोहन सिंह म्हणाले, सहकारात कॅशलेस व्यवहार वाढल्यास सहकारात पारदर्शकता येईल. महात्मा गांधींसह सहकारातील नेत्यांनी शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिक समृध्द बनविण्याचे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न पूर्ण करण्याचे आमचे धोरण आहे. भविष्यात सहकारात चळवळ वाढीविण्यासाठी कुशल मनुष्यबळ, संशोधन आणि संस्कारक्षम नेतृत्वाची गरज आहे.
गेल्या 30 महिन्यांत सरकारने अनेक योजना आणल्या असून, देशात विविध क्षेत्रांचा विकास होत असल्याचे दिसून येत आहे. देशात 8 लाख सहकारी संस्था आणि 1200 मल्टीस्टेट्स शेडुल्ड संस्था आहेत. ग्रामीण भागातील 90 टक्के लोक या संस्थांशी जोडलेले आहेत. गेल्या 70 वर्षात देशात श्रीमंतांची श्रीमंती वाढली आणि गरीब गरीबच राहिले. गरिबी हटाव अशा घोषणा करून गरिबी नष्ट होत नाही. गरीब आणि शेतकर्‍यांना समृध्द केले तर देश संपन्न होईल. डॉ. चंद्रपाल सिंह यादव, अनिल शिरोळे, डॉ. एन. सत्यनारायण, राजेश परचु यांचीही भाषणे झाली.