Breaking News

धोनीनं निवृत्ती घेतली असती तर मी धरणं धरलं असतं: गावसकर

मुंबई, दि. 06 - ‘धोनीनं जर खेळाडू म्हणून क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असती तर त्याच्या या निर्णयाविरोधात मी त्याच्या घराबाहेर धरणं देऊन बसलो असतो.’ अशी प्रतिक्रिया माजी क्रिकेटर सुनील गावसकर यांनी दिली आहे. धोनीनं फक्त कर्णधारपद सोडलं असून तो यापुढेही खेळत राहणार असल्यानं गावसकर यांनी समाधान व्यक्त केलं आहे.
धोनीच्या निर्णयाबद्दल बोलताना गावसकर म्हणाले की, ‘एका खेळाडू म्हणून तो आजही विस्फोटक आहे. तो आजही एका षटकात सामना पालटू शकतो. एक खेळाडू म्हणून भारताला त्याची फार गरज आहे. विकेटकिपर आणि फलंदाज म्हणून आजही तो बरंच योगदान देऊ शकतो.’ आता धोनी कर्णधार नसल्याने त्याच्या फलंदाजी आणि विकेटकीपिंगमध्ये त्याला नक्कीच फायदा होईल. विराट कोहली आता नक्कीच धोनीला चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर खेळविण्याचा निर्णय घेईल. त्यामुळे तो आता मोठी खेळीही उभारु शकतो. त्यामुळे तो एक चांगल्या फिनिशरची जबाबदारी नक्कीच बजावेल.’ असंही गावसकर म्हणाले.
गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाबाबत आता त्याला फार विचार करावा लागणार नाही. त्यामुळे तो विकेटकीपिंगवर अधिक लक्ष देऊ शकतो. त्यामुळे धोनी आणि कोहली हे मैदानावर एकमेकांना पूरक ठरु शकतात. कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या चुका सुधारण्यास थोडा वेळ असतो. पण वनडे आणि टी20 मध्ये ती संधी फारशी नसते. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेणं महत्वाचं असतं. त्यामुळे अशावेळी धोनीचं संघात असणं उपयोगी ठरु शकतं.’ असं मत गावसकर यांनी व्यक्त केलं.