Breaking News

अंनिसतर्फे दुध पिण्याचे अभियान

सातारा, दि. 2 (प्रतिनिधी) : दारू नको, दूध प्या... चला व्यसन बदनाम करूया... अशा घोषणा देत सातार्‍यातील पोवई नाक्यावरील शिवाजी सर्कल परिसरात  शनिवारी परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था व अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे तरुणांना मोफत दूध वाटप केले. 
थर्टी फर्स्टला पार्टी करण्याकडे तरुणाईचा ओढा असतो. यामध्ये ओल्या पार्ट्या आणि मद्यपान केले जाते. व्यसनाधिनतेकडे चाललेल्या तरुणाईला व्यसनापासून  परावृत्त करण्यासाठी सातार्‍यातील परिवर्तन व्यसनमुक्त संस्था व अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे दरवर्षी 31 डिसेंबर रोजी जनजागृती कार्यक्रम आयोजित केला  जातो. पोवई नाक्यावरील शिवाजी सर्कल परिसरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बॅनर लावून व्यसनमुक्तीच्या घोषणा दिल्या. तसेच तरुणांना पिण्यासाठी मोफत  दूध देण्यात आले. यावेळी अंनिसचे राज्य सरचिटणीस, पश्‍चिम महाराष्ट्र विभाग हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, किशोर काळोखे, उदय चव्हाण उपस्थित होते.
नववर्ष स्वागताच्या पार्श्‍वभूमीवर शनिवार, दि. 31 रोजी दारूची दुकाने रात्री एकपर्यंत सुरू ठेवण्याची विशेष परवानगी देण्याचे निर्देश राज्य शासनाने जाहीर केले  आहेत. हा निर्देश तरुणांसाठी घातक आहे. रात्री उशिरापर्यंत दारू दुकाने सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय म्हणजे समाजात व्यसनाधिनता वाढवणे आहे. व्यसन करून  वाहने चालविल्याने अपघातांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यसनाला बदनाम करण्यासाठी तरुणांनी एकत्र येण्याची गरज आहे.