कॅशलेस व्यवहाराबाबत जनजागृती करावी : अश्विन मुद्गल
सातारा, दि. 2 (प्रतिनिधी): कॅशलेस व्यवहाराला चालणा देण्यासाठी सर्व बॅकांनी आराखडा तयार करुन कॅशलेस व्यवहाराबाबत जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक मुद्गल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला बँक ऑफ महाराष्ट्रचे अंचल प्रबंधक अहिलाजी थोरात, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक महादेव शिरोळकर, आरबीआयचे हेमंत दंडवते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एन. एल. थाडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एन. सरकाळे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक वृषाली सोने उपस्थित होते.
जनधन योजनेंतर्गत ज्यांनी खाती उघडली आहेत त्यांना तात्काळ रुपे कार्डचे वाटप करा हे कॅशलेसच्या दृष्टीने महत्वाचे आहे, असे सांगून मुद्गल म्हणाले, मुद्रा योजनेच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून येत आहे. बँकांनी मुद्रा योजनेंतर्गत किती लाभार्थ्यांना कर्ज पुरवठा केला. याची माहिती शाखानिहाय द्यावी. आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेकडून प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांना सर्व बँकांनी मुद्रा योजनेंतर्गत कर्ज पुरवठा करावा. तसेच आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेकडून उद्योगात कोणत्या प्रशिक्षणार्थ्यांची गरज आहे. याचा अभ्यास करुन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करावे.
बँकांनी व विविध महामंडळांनी आपापसात समन्वय ठेवून काम करावे. शासनाच्या विविध विभागांकडून येणार्या अर्थ सहाय्याची प्रकरणे तात्काळ निकाली काढावेत. ज्या बँकांना 5 हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये बँक शाखा घडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत अशा बँकांनी तात्काळ बँक शाखा सुरु करावी. तसेच सर्व बँकांनी विविध ठिकाणी कॅशलेस व्यहाराविषयी कार्यशाळेचे आयोजन करुन कॅशलेस व्यवहार कसे वाढतील याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन मुद्गल यांनी शेवटी केले.
या बैठकीचे प्रास्ताविक बँक ऑफ महाराष्ट्रचे अंचल प्रबंधक अहिलाजी थोरात यांनी केले तर सर्वांचे आभार अग्रणी जिल्हा व्यवस्थापक महादेव शिरोळकर यांनी मानले. या बैठकीस विविध विभागाचे अधिकारी, विविध बँकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.