Breaking News

वर्षाअखेर पिंपरी महापालिकेकडे मिळकत करातून 317 कोटीं रुपये जमा

पुणे, दि. 02 - पिंपरी-चिंचवड महापालिकेने 2016 या वर्षात विक्रमी करसंकलन केले असून 31 डिसेंबर 2016 अखेर महापालिकेच्या तिजोरीत 317 कोटी 98  लाख रुपयांचा मिळकत कर जमा झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेने यंदा 38 कोटी 54 लाखांची वाढ झालेली आहे. करसंकलन विभागाकडे चालू  आर्थिक वर्षात (2016-17) मागील नऊ महिन्यात  31 डिसेंबरअखेर एकूण 317 कोटी 98 लाख इतका मिळकत कर नागरिकांनी भरला आहे. मागील वर्षाचे  तुलनेने 38 कोटी 54 लाखांची वाढ झाल्याचे दिसून येते. तर, डिसेंबर महिन्यात फक्त 15 कोटी 70 लाख इतका मिळकत कर जमा झाला आहे. नोव्हेंबर  महिन्यात तो 43 कोटी 26 लाख इतका झाला होता. थकीत मिळकतधारकांकडून कर वसूल करण्यासाठी पालिकेने जोरदार प्रयत्नही मागच्या काही महिन्यात  केले. तसेच, नोटाबंदीनंतर जुन्या नोटांद्वारे पैसे स्विकारल्याने थकबाकी वसूल होण्यास मदत झाली. या सगळ्याचा लाभ महापालिका तिजोरीला झाला असून  गतवर्षीच्या तुलनेत मिळकत करात वाढ झाली आहे. महापालिका हद्दीत 4 लाख 44 हजार 709 मिळकती नोंदणी झालेल्या असून मिळकतकर विभागाला  महापालिकेचे साडेचारशे कोटी रुपये उत्पन्नाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे उर्वरित तीन महिन्यात मिळकत कर विभागाने किमान सव्वाशे कोटी रुपयांची वसुली करणे  अपेक्षीत आहे.