Breaking News

महाराष्ट्रातील चार अंगणवाडी सेविकांना राष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्ली, दि. 23 - महाराष्ट्रातील चार अंगणवाडी  सेविकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अंगणवाडीमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल  आज केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री मेनका गांधी यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले.
येथील अशोका हॉटेलमध्ये केंद्रीय महिला व बाल कल्याण विभागाच्यावतीने वर्ष 2014-15 व 2015-16 या वर्षासाठी अंगणवाडी सेविकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री मेनका गांधी होत्या. यावेळी केंद्रीय महिला व बाल कल्याण राज्यमंत्री कृष्णा राज यांच्यासह वरिष्ठ अधिकारी मंचावर उपस्थित होते.
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडळ येथील अंगणवाडी क्रमांक 85 च्या अंगणवाडी सेविका शैलजा वंळजू यांना वर्ष 2014-15 वर्षासाठी पुरस्कृत करण्यात आले. वर्ष 2015-16 साठी अमरावती जिल्ह्यातील वरूड येथील अंगणवाडी क्रमांक 34 च्या रत्नमाला शिवहरी ब्राम्हाने तसेच अंगणवाडी क्रमांक 92 च्या सुनीता नथीले आणि ठाणे जिल्ह्यातील सेहरी येथील अंगणवाडी क्रमांक 52 च्या  बबिता प्रभाकर भुजबळ यांना आज पुरस्कृत करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप 25 हजार रूपये रोख व प्रशस्ती पत्र असे आहे.