Breaking News

गुरूनानकसिंग बंधा-यातील पाणी दोन गावांची तहान भागविणार

नांदेड, दि. 28 - नानकसर गुरुद्वारा लगत असलेल्या झरी रस्त्यावरील खदानीला गुरुनानकसिंघ बंधारा असे नाव देवून संत बाबा बलविंदरसिंग  यांच्या पुढाकाराने गुरुद्वारा कारसेवकांनी बंधारा बांधला असून या बंधार्यातील पाणी दोन गावांची तहान भागवणार असल्याचे प्रतिपादन संत बाबा बलविंदरसिंघ  यांनी केले. गुरुनानकसर परिसरालगत असलेल्या झरी रस्त्यावरील भव्य खदानीला बंधारा बांधुन यात नैसर्गिक पाणीसाठी साठविण्यात आल्याने यातून झरी व धनगरवाडी या  गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. व उर्वरित पाणी गुरुनानकसिंग गुरुद्वाराद्वारे उपयोगात आणल्या जातो. या बंधार्या शेजारी असलेल्या जमीनीचे  सुशोभिकरण करुन यात्रेकरुंना पर्यटनस्थळ साकारण्याचा मनोदय यावेळी गुरुद्वारा कारसेवाकार संत बाबा बलविंदरसिंघ यांनी व्यक्त केला. यावेळी गुरुद्वार्याचे  मुख्य पुजारी संत बाबा नरेंद्रसिघजी, कारसेवाकार संत बाबा बलविंदरसिंघजी, बाबा सुखविंदर सिंघजी, बाबा बिल्लासिंघजी, बाबा ग्यानी बक्षीससिंघजी, बाबा  जस्सासिंघजी, बाबा डॉ. हरविंदरसिंघजी विष्णुपूरी गुरुद्वारा यांच्या पुढाकारातून गेल्या अनेक वर्षापासून झरी रस्त्यावरील खदानीत नैसर्गिक पाणीसाठा होत होता.  परंतु तो पाणी साठा विसर्जीत होत असल्यामुळे या खदानीला बंधारा बांधुन घेण्याची सुचना तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी, यांनी गुरुद्वारा कारसेवाकार  बाबा बलविंदरसिंघ यांच्यापुढे मांडली. त्यानंतर या बंधार्याचे काम पुर्णत्वास गेले. या बंधार्यामुळे या खदानीत मुबलक पाणी साठा होवून दोन गावांना झरी व धनगरवाडी या गावांना पिण्याचा पाणी पुरवठा होत असल्याने या दोन गावची तहान भागली असली तरी या परिसरातील जमिनीवर सुशोभीकरण करुन गुरुद्वारा दर्शनासाठी येणार्या भाविकांसाठी हे पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करणार असल्याचा मनोदय संत बाबा बलविंदरसिघ यांनी व्यक्त केला. या बंधार्याच्या पाणी साठ्यामुळे परिसरातील विहीर, बोअर आदींना मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होणार आहे.