स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एमआयएम स्वबळावर लढवणार
लातूर, दि. 28 - कालच्या नगरपालिका निवडणुकीत एमआयएमला उदगिरात सहा जागा मिळाल्या. यामुळे या पक्षाचा विश्वास दुणावला असून लातूरच्या आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकात स्वबळावर लढण्याचा निर्धार या पक्षाने केला आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत या पक्षाचे लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष सय्यद ताहेर हुसेन यांनी ही माहिती दिली. लातुरच्या या निवडणुका लढवताना काही स्थानिकांना सोबत घेऊन आघाडी केली जाईल. एमआयएमच्या वतीने उमेदवारी देताना सर्वच जाती धर्मांचा विचार केला जाईल असेही हुसेन यांनी सांगितले. उदगिरात लोकांनी चांगली साथ दिली, अशाच प्रकारे लातुरकरही स्विकारतील, समविचारी पक्ष आणि संघटनांशी बोलणी सुरु आहे, त्याचाही निर्णय लवकरच होईल असेही हुसेन म्हणाले. यावेळी अॅड. प्रभाकर काळे, सन्नाउल्ला खान, सय्यद अनवर, अफजल कुरेशी उपस्थित होते. एमाअयएमच्या रुपाने आलेल्या या वादळाशी कसा मुकाबला करायचा याची काळजी सगळ्याच पक्षांना पडली आहे. हा पक्ष काँग्रेसची मते खाईल अशी भाजपाची धारणा असल्याने या पक्षाला आपला विजय दिसत आहे. एमआयएम आणि भाजपात साटेलोटे असल्याचा आरोप केला जातो पण त्यात तथ्य नसल्याचे आजच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष मोहम्मद अली आणि अफजल कुरेशी यांच्यातील वाद वैयक्तिक होता. या प्रकरणाशी पक्षाचा कसलाही संबंध नाही. भविष्यात या दोघांनाही पक्षाकडून मोठी जबाबदारी मिळू शकते असेही हुसेन यांनी स्पष्ट केले.