Breaking News

अभियंत्यांच्या पदोन्नतीत मोठा आर्थिक घोटाळा ः आर. एस. कुमार

पुणे, दि. 23 - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागातील काही उपअभियंता यांना कार्यकारी अभियंतापदी पदोन्नती देताना मोठा आर्थिक घोटाळा  झाल्याचा आरोप करून ज्येष्ठ नगरसेवक आर. एस. कुमार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वसाधारण सभेत गुरूवारी (दि. 22) घरचा आहेर दिला. विशेष म्हणजे  पदोन्नत्या देण्याची उपसूचना माजी महापौर योगेश बहल यांनी मांडली होती. पदोन्नती देण्याचा अधिकार प्रशासनाला आहेत. महापौर शकुंतला धराडे सभेच्या  अध्यक्षस्थानी होत्या. डॉ. वृषाली तेलंग यांना कान-नाक-घसा तज्ज्ञ या पदावर नियुक्ती देण्याचा विषय सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. त्यावर झालेल्या  चर्चेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक आर. एस. कुमार यांनी मागील सभेत काही उपअभियंत्यांना कार्यकारी अभियंतापदी दिलेल्या पदोन्नतीची मुद्दा उपस्थित केला. ही  पदोन्नती देताना शासनाचे नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या सर्व प्रकारात मोठा आर्थिक  घोटाळा झाल्याचा आरोप करून त्यांनी राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला.