Breaking News

पक्षांसाठी वन संवर्धनात सर्वांनी पुढाकार घ्यावा - मुनगंटीवार

औरंगाबाद, दि. 28 - पक्षांचा अधिवास जंगलात आहे. त्यामुळे जंगलाचे संवर्धन काळाची गरज आहे. शासनाने त्यामुळे 2 कोटी वृक्ष लागवड मोहीम  यशस्वीरित्या राबविली. त्यातून वन आणि वन्यजीवांचे संवर्धन होण्यास हातभार लागला. त्यासाठी पक्ष्यांच्या संवर्धनासाठी वनसंवर्धन करण्याकरीता सर्वांनी  पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
महसूल व वन, वन्यजीव विभाग आणि एनव्हायरमेण्टल रिसर्च फाऊण्डेशन अ‍ॅण्ड एज्युकशनल अ‍ॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जायकवाडी पक्षी  अभयारण्य आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पैठण येथील मराठवाडा प्रशासकीय व प्रशिक्षण प्रबोधिनी येथे महोत्सवाचा उद्घाटन  समारंभ पार पडला. या कार्यक्रमास विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पैठणचे नगराध्यक्ष सुरज लोळगे, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, माजी आमदार अनिल  पटेल, भाऊ थोरात, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे अर्दड, अप्पर  जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, मानद वन्यजीव रक्षक डॉ. दिलीप यार्दी, लक्ष्मण आवटे, लक्ष्मण सावजी, बसवराज मंगरुळे  व वन व वन्यजीव विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, या पक्षी महोत्सवात पक्ष्यांच्या संदर्भातील ज्ञानात पक्षी  प्रेमींमध्ये भर पडेल. यापुढेही याठिकाणी जायकवाडी पक्षी अभयारण्य ज्ञानकेंद्र होईल. या अभयारण्याच्या विकासासाठी शासनामार्फत आवश्यक तो निधी देऊन  या भागाचा सर्वोतोपरी विकास करण्यावर भर असेल, परंतु पक्ष्यांचे निवासस्थान वन असून त्याकरीता वृक्षलागवड महत्त्वाची आहे. परदेशातून याठिकाणी  लाखोंच्या संख्येने पक्षी येतात. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. त्याकरीता त्यांच्यासाठी जंगल वाचवणे महत्त्वाचे आहे. तसेच ती प्रत्येकाची जबाबदारी  आहे. निसर्गचक्रात सर्वच घटक महत्त्वाचे आहेत. ते एकमेकांवर अवलंबून असून त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर असल्याने ती प्रत्येकाने पार  पाडावी, असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, अभयारण्य प्रत्येक जीवाच्या जीवनाशी निगडीत आहे. स्थलांतरीत पक्षांना  पाहण्याचा आनंद आपण या महोत्सवाच्या माध्यमातून तीन दिवस घेणार आहोत. मात्र चिमणी, पावशा पक्षी आता दिसेनासे झाले आहेत. सुगरणीचा खोपा हा  स्थापत्यशास्त्रातील उत्तम दर्जा आणि नमुना आहे. त्या खोप्यावरुनच पूर्वी जाणकार वादळाची कल्पना करत. म्हणूनच देशी पक्ष्यांचे महत्त्व जाणून त्यांचे सवंर्धन  प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. या सर्वांचे मूळ वन संवर्धनातच आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियानाप्रमाणेच प्रत्येकाने वनयुक्त शिवार करावे, असेही ते म्हणाले.  विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी पक्षी महोत्सवाचा उद्देश सांगून या महोत्सवात छायाचित्र प्रदर्शन, चर्चासत्र, जनजागृती करण्यात येणार आहे. पक्षी  अभ्यासक, मित्रांनी, विद्यार्थ्यांनी या महोत्सवाचा आनदं घ्यावा, असे यावेळी सांगितले. डॉ. दिलीप यार्दी यांनीही यावेळी पक्ष्यांबाबत माहिती दिली. प्रारंभी  सोनेवाडी येथे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षी निरीक्षण केले. त्यानंतर मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण  प्रबोधिनीतील छायाचित्र प्रदर्शनाची पाहणी केली. तसेच याठिकाणी वृक्षरोपाचे पूजन व जल अर्पण करुन श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते पक्षी महोत्सवाचे उद्घाटन  झाले. या कार्यक्रमास वन विभागाचे उपवनसंवरक्षक अशोक गिर्हेपुजे, पक्षी मित्र अमेय देशपांडे, श्रावण परळीकर, रंजन देसाई, जय जोशी यांच्यासह अनेक  शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.