रालोआ सरकारकडून शेतकर्यांचा विश्वासघात ः खा. शेट्टी
सांगली, दि. 27 - गेल्या अडीच वर्षात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारच्या काळात एकही घोटाळा झाला नसला तरीही रालोआने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पाळले नाही. न्यायालयात दीडपट हमीभाव देणे शक्य नसल्याचे प्रतिज्ञापत्र देऊन या सरकारने शेतकर्यांचा विश्वासघात केला आहे. अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी केला आहे. कॉर्पोरेट कंपन्यांची नऊ लाख कोटींची कर्जे बुडीत कशामुळे व कशासासाठी केली जात आहेत, असा सवालही त्यांनी केला. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, एकीकडे विजय मल्ल्यासारखे मोठे उद्योजक कोट्यावधी रुपयांची कर्जे बुडवून परदेशात पळून जात आहेत, तर दुसरीकडे बँका मात्र शेतकर्यांच्या कर्जाची मुदत संपलेली नसतानाही त्यांना शासनाकडून मिळालेल्या पैशातून कर्जाच्या रक्कमेची परस्पर कपात करीत आहेत. कर्जदार शेतकरी आपले शेत बरोबर घेऊन विजय मल्ल्यासारखे पळून जाणार नाहीत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने मित्रपक्षांना सन्मानजनक वाटा दिला नाही, तर आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया व शिवसंग्राम पक्ष या मित्रपक्षांबरोबर आघाडी करुन भाजपच्या विरोधात निवडणूक लढवू. त्यांनी पुढे म्हंटले आहे की, पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गंत शेतकर्यांना उत्पादनाचे संरक्षण मिळते. परंतु उत्पन्नाचे मिळत नाही. पीक विमा कंपन्यांकडून शेतकर्यांची फसवणूक केली जात आहे. शेतकर्यांचे नुकसान होत आहे. याप्रकरणी आपण केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर ही बाब घातली. गतवर्षी केवळ 2.5 एकर शेती असलेल्या शेतकर्यांना शासनाने नुकसान भरपाई दिली. परंतु, 2.5 एकरच्या वर शेती असलेल्या बागायतदारांना अद्यापही नुकसानभरपाई मिळाली नाही. नोटा बंदीच्या निर्णयामुळे शेतकर्यांचा माल रोखीने खरेदी करण्यास व्यापारी तयार नाहीत. हे व्यापारी शेतकर्यांना आता धनादेश देऊ लागले आहेत. परंतु, पूर्वी रोखीने व्यवहार करणार्या व्यापार्यांवर आता धनादेश दिल्याबद्दल सरकारने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पत्रकात केली आहे.