Breaking News

नागरिकांना सुविधा द्या, मगच स्वच्छता अभियान राबवा

सांगली, दि. 27 - महापालिका हद्दीत खराब रस्ते, तुंबलेल्या गटारी, अशुद्ध पाणी नागरिकांच्या माथी मारले जात असताना, स्वच्छ महाराष्ट्र अभियानात स्वतःचा  डंका पिटला जात आहे. महापालिका प्रशासनाने हिंमत असेल तर नागरिकांच्या असुविधांचे चित्रिकरण करुन शासनाला सादर करावे. आधी नागरिकांना सुविधा  द्या, मगच स्वच्छ अभियानावर पैशाची उधळण करा, असा इशारा देत शिवसेनेच्यावतीने सांगलीत निदर्शने करण्यात आली.
महापालिकेच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या प्रसिद्धीसाठी ब्रॅड अ‍ॅम्बॅसिडर म्हणून अभिनेत्री सई ताम्हणकर यांची निवड केली आहे. त्यांच्यासोबत सांगलीतील काही  कलाकारांना स्वच्छतादूत अभियानात काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी रविवारी येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यलृहात ऑडिशन घेण्यात आल्या.  यावेळी शिवसेनेच्यावतीने पालिकेच्या कारभाराविरोधात निदर्शने करण्यात आली. सांगली ब्रॅन्ड व्हावे, असे कोणते दिवे महापालिकेने लावले आहेत? असा सवालही  आंदोलकांनी केला.स्वच्छ सांगलीची चित्रफीत काढली जाणार आहे. त्यात प्रशासनाने कचर्‍याचे ढीग, मोकाट कुत्री, खराब रस्ते, खड्डे, शेरीनाल्यामुळे दूषित  होणारी कृष्णा नदी, तुंबलेल्या गटारींचे चित्रीकरण करावे. धोत्रेआबा व वडर कॉलनीतील झोपडपट्टी धारकांचा संसार पाच वर्षापासून रस्त्यावरच आहे. त्यांना साधे  घरकुल मिळू शकलेले नाही. या कुटुंबांची ससेहोलपट सुरु आहे. त्यांचाही चित्रफितीत समावेश करावा. नागरिकांना गैरसोयीत ठेवून जनतेच्या पैशाचीा उधळण  सुरु असेल, तर शिवसेना हा डाव उधळून लावेल, असा इशाराही देण्यात आला.यावेळी जिल्हा उपप्रमुख अजिंक्य पाटील, अनिल शेटे, प्रसाद रिसवडे, दिलीप  शिंदे, ओंकार देशपांडे, संजय हंजे, सतीश मालू, प्रा. नंदकुमार सुर्वे उपस्थित होते.