Breaking News

इस्लामपूरात 28 डिसेंबरला महाआरोग्य मेळावा

सांगली, दि. 22 - आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे काही कुटुंबांमध्ये औषध उपचाराच्या खर्चाची वानवा आहे. रोगी व्यक्तीवर योग्य वेळी उपचार करुन  त्यांना जीवनदान देणे हीच खरी आरोग्य सेवा आहे. समाजातील वंचित घटकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी, यासाठीच इस्लामपूर येथे दिनांक 28 डिसेंबर  2016 रोजी आरोग्य महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या आरोग्य महामेळाव्याच्या आयोजनासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी आपआपली जबाबदारी योग्य  रितीने पार पाडावी. तसेच, ग्रामीण भागातील अधिकाधिक नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज येथे  दिले. 
इस्लामपूर येथील प्रकाश हॉस्पिटल व रिसर्च सेंटर येथे नियोजित आरोग्य महामेळाव्याच्या पार्श्‍वभूमिवर अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी  इस्लामपूरचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष निशिकांत पाटील, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, इस्लामपूर  उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल बोल्डे, जिल्हा आरोग्य  अधिकारी डॉ. राम हंकारे, इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.
राज्यमंत्री म्हणाले, प्रकाश हॉस्पिटल व रिसर्च सेंटर येथील नियोजित आरोग्य महामेळाव्यामध्ये रुग्ण तपासणी व उपचारासाठी राज्यातील विविध क्षेत्रातील दोनशे  नामवंत डॉक्टर्स उपलब्ध होणार आहेत. तसेच नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने उपस्थित राहून नेत्र तपासणी करणार आहेत. हा आरोग्य महामेळावा योग्य  रितीने पार पाडण्यासाठी आरोग्य विभागाने योग्य नियोजन करुन त्याप्रमाणे येत्या काळात कार्यवाही करावी. त्यासाठी लागणारी औषधे, वैद्यकीय साहित्य  मेळाव्याच्या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात यावे. या महामेळाव्याच्या आयोजनासाठी शासन स्तरावरुन सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे. या आरोग्य  महामेळाव्याच्या लाभ सर्वसामान्य जनतेला होण्यासाठी याची व्यापक प्रमाणात प्रसिध्दी करण्याच्या  सूचना त्यांनी शेवटी केल्या.
जिल्हाधिकारी शेखर गायकवाड म्हणाले, आरोग्य महामेळाव्याच्या आयोजनासाठी जिल्हा प्रशासन तयारी करीत असून मेळाव्याच्या दिवशी कोणत्याही रुग्णांना  अथवा त्यांच्या बरोबर असणार्‍या व्यक्तीला त्रास होणार नाही दक्षता घेईल. या आरोग्य महामेळाव्यात सहभागी होणार्‍या रुग्णांकडून प्रवेश अर्ज भरुन घेण्यात येणार  असून त्याप्रमाणे नियोजन करण्यात येईल. या मेळाव्याचा जास्तीत जास्त लोकांना लाभ व्हावा, यासाठी याचा व्यापक प्रचार व प्रसार करण्यात येईल. हा आरोग्य  महामेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन याचा योग्य आराखडा तयार करणार असून त्याप्रमाणे पुढील कालावधीत त्यांची अंमलबजावणी करणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आरोग्य महामेळाव्याच्या आयोजनासाठी सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्यात  येईल. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला बाल कल्याण विभाग या मेळाव्यासाठी नियोजन करुन हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील  राहील. या मेळाव्याची जनजागृती करण्यासाठी शिक्षण विभाग प्रत्येक माध्यमिक व प्राथमिक शाळेमध्ये आरोग्य मेळाव्याची माहिती घरोघरी पोहचविण्याचे काम  करेल.
इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील म्हणाले, आरोग्य महामेळाव्याच्या आयोजनासाठी व हा मेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी इस्लामपूर नगरपरिषदेच्या  वतीने व प्रकाश हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या माध्यमातून सर्व सहकार्य करण्यात येईल. या मेळाव्यासाठी लागणार्‍या मूलभूत सुविधा तात्काळ उपलब्ध करुन देण्यात  येतील.