Breaking News

लोकांचा त्रास थांबवा अन्यथा हातात दगड घेवू ः संजय कोले

सांगली, दि. 22 - केंद्र सरकारने नोटा बंदीचा निर्णय आजच्या तरुणाईला मतदानाच्या स्वरुपात आकर्षित करण्यासाठी केला आहे. पण नोटा बंदीमुळे जनजीवन  विस्कळीत झाले आहे. लोकांचे प्रचंड हाल सुरु आहेत. सरकारने आता लोकांना त्रास देणे बंद करावे, अन्यथा हातात दगड घ्यावा लागेल, असा इशारा शेतकरी  संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष संजय कोले यांनी दिला.
नोटाबंदी कुणाला संधी आणि कुणाची नाकेबंदी या विषयावर गणपतराव आरवडे कॉलेज ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित केलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. स्वागत व  प्रास्ताविक सुरेश पाटील यांनी केले. यावेळी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुरेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ, प्रा. डॉ. व्ही.  बी. जुगळे, प्राचार्य व्ही. बी. कोडग प्राचार्य  एस. एस. शेजाळ अनिता पाटील, माधव कुलकर्णी आदी उपस्थित होते.
कोले म्हणाले, नोटाबंदी करुन लोकांच्या बँक व्यवहारावर लक्ष केंद्रित करण्याची जबाबदारी सरकारने आयकर विभागाकडे दिली असली तरी, देशात सर्वाधिक  भ्रष्टाचार आयकर विभागातच होतो.
सरकारी यंत्रणाही भ्रष्टाचारी आहे. नेता तस्कर गुंडा अफसर अशी देशाची अवस्था झाली आहे. नोटा बंदीनंर भाजपने सर्वाधिक पैसा नगरपालिका निवडणूक  जिंकण्यासाठी खर्च केला आहे, नोटाबंदी करुन मोठी क्रांती करीत असल्याचा आव आणणार्‍या सरकारने लोकांना त्रास देणे आता बंद करावे, अन्यथा हातात दगड  घ्यावा लागेल.
सभापती शेजाळ म्हणाले, नोटा बंदीची सरकारने घेतलेला निर्णय अतिशय चुकीचा ठरला आहे. या निर्णयातून काळा पैसा बाहेर काढण्याचे केवळ गाजर दाखविले  आहे. मार्केट यार्डातील उलाढाल 40 टक्क्यांवर आली आहे. शेतकरी, हमाल व व्यापारी अडचणीत आला आहे. नोटा बंदीमुळे मार्केट कमिटी तोट्यात जाण्याची  शक्यता निर्माण झाली आहे.
प्रा. डॉ. जुगळे म्हणाले, भारतामध्ये आर्थिक अशिक्षितपणा जास्त आहे. सरकारने स्वतःची सोय म्हणून नोटा बंदीचा निर्णय करुन नवीन दोन हजाराची नोट  चलनात आणली आहे. नोटा बंदीमुळे कारखानदार, छोटे मोठे उत्पादक, उपभोगकर्ते यांच्यावर परिणाम झाला आहे. साठ टक्के उद्योगपतींचा पैसा परदेशात गेला  आहे.