Breaking News

बळीराजा व एकलव्य जयंतीनिमित्त नगरमध्ये उत्साहात साजरी

अहमदनगर (प्रतिनिधी) । 03 - नगरमध्ये विविध सामाजिक व पुरोगामी संघटनांच्यावतीने बलीप्रतिपदेच्या दिवशी बळीराजा व सम्राट एकलव्य यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी नगरमधील दिल्लीगेट येथून मिरवणूक काढून शहरातील नागरिकांना महाराष्ट्र शासनाच्या बार्टीने छापलेल्या भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाटप करण्यात आले. नागरिकांनी राज्य घटनेप्रती आपली बांधिलकी आणखी पक्की करावी व समाजात एकजुटीने व एकजीवाने रहावे हा उद्देश यामागे असल्याचे संयोजकांनी सांगितले. 
बळी महोत्सवाचे हे दशकपुर्ती वर्ष होते. शेतकर्‍यांचा राजा बळीराजा व सम्राट एकलव्य यांची गत दहा वर्षापासून नगरमध्ये वाजत-गाजत मिरवणूक निघत असते. या मिरवणुकीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्यातील हिंदु-मुस्लीम बांधव एकत्रितपणे हा महोत्सव साजरा करतात. तसेच याप्रसंगी आदिवासी बांधवांचीही मोठया प्रमाणात उपस्थिती असते. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहु महाराज यांचे वडिल चौथे शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळापासून या मिरवणुकीला सुरुवात झाली. पुणे येथील राष्टसेवा दलाचे सुभाष वारे व आदिवासी भगिनींच्या हस्ते समाधी व पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी वारे यांनी उपक्रमाचे कौतुक करुन देशातील शेतकरी व सामान्यांची स्थिती सुधारण्यासाठी व्यापक एकजुटीचे महत्व विषद केले. माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ झालेल्या कार्यक्रमात कॉ. बहिरनाथ वाकळे, हभप अजय महाराज बारस्कर, कॉ. महेबुब सय्यद , सुरेखाताई कोल्हे, कृषिअधिकारी गवारे आदिंनी मार्गदर्शन केले. यावेळी समिती अध्यक्ष कॉ. संदीप पवार, सचिव बापू बनकर, मराठा सेवा संघाचे अभिजीत वाघ, आसिफखान दुलेखान, राजश्री माळी, राजेंद्र गोलवड, राजुभाई शेख, युनुसभाई तांबटकर, विठ्ठल बुलबुले, फिरोज शेख, सुधाकर शेलार, कॉ. रामदास वाघस्कर, थोटे सर, अशोक सब्बन, दत्ता वडवणीकर, संतोष गायकवाड, कॉ. नानासाहेब कदम,  जाधव, कॉ. अतुल महारनवार यश सकट, महादेव पठारे, कॉ. संदीप सकट, प्रविण सोनवणे, रविंद्र सातपुते, संभाजी तोडमल, दिगंबर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.