Breaking News

प्रदर्शनातून मिळणारा नफा ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ‘साठी देणार

। ‘रोटरी‘चा हा प्रयत्न सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍यांना प्रेरणा देणारा - महापौर सुरेखा कदम

अहमदनगर, दि. 20 - दिवाळी धमाका प्रदर्शन आयोजित करून नगरकरांना विविध वस्तुंच्या खरेदीची चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. या प्रदर्शनाच्या  माध्यमातून मिळणारे उत्पन्न बेटी बचाओ, बेटी पढाओ या मोहिमेसाठी देण्यात येणार आहे. सामाजिक संस्थांनी अशा प्रकारचे उपक्रम राबवून वंचितांना व  गरजवंतांना मदत केल्यास त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतील. ‘रोटरी‘चा हा प्रयत्न सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍यांना प्रेरणा देणारा आहे, असे प्रतिपादन  महापौर सुरेखा कदम यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ अ.नगर प्रियदर्शनी व स्वीट होम, सावेडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी धमाका प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते करण्यात  आले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी क्लबच्या अध्यक्षा माधुरी सारडा, सुरभी बोगावत, डॉ. प्राची पाटील, डॉ. आशा फिरोदिया, छायाताई फिरोदिया,  यास्मीन जालनावाला, कविता काणे, मीना मोरे, प्रतिभा धूत, पायल चंगेडिया, नीलमणी गांधी, रिना मणियार, डॉ. स्मिता तारडे, क्षीतीजा सारडा आदी उपस्थित  होत्या.
प्रदर्शनाबद्दल माहिती देताना क्लबच्या अध्यक्षा माधुरी सारडा म्हणाल्या की, या प्रदर्शनात नगर शहरातील विविध क्षेत्रातील महिला उद्योजकांनी त्यांच्या वस्तुचे  स्टॉल उभारले आहेत. या स्टॉलद्वारे महिलांना विविध वस्तु वाजवी दरात उपलब्ध होतील. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असून, दिवाळीसाठी लागणार्‍या  अनेक वस्तु येथे खरेदीस वाव आहे. नगरकरांनी विशेषतः महिलांनी या प्रदर्शनास भेट देऊन खरेदीचा आनंद लुटावा, असे आवाहन त्यांनी केले.
सुरभी बोगावत म्हणाल्या की, या प्रदर्शनाद्वारे मिळणारा नफा आम्ही बेटी बचाओ, बेटी पढाओ या उपक्रमासाठी देणार आहोत. अशा प्रकारचे उपक्रम आयोजित  करून समाजाला संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सामाजिक जाणिवेचे भान ठेवत आम्ही समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहोत. समाजामध्ये जागृती  करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.